Maharashtra Politics : बातमी आहे महायुतीची (Mahayuti) चिंता वाढवणारी. कारण भारत जोडो अभियानाने (Bharat Jodo Abhiyan) विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मतदारसंघांची वैचारिक मशागत करण्याची जबाबदारी ही भारत जोडो अभियानाने खांद्यावर घेतली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळातही भारत जोडो अभियानाने देश पातळीवर इंडिया आघाडीसाठी काम केले होते. यात सुमारे 78 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या विजयात पडद्यामागून भारत जोडो अभियानानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्यात 150 तर विदर्भात 45 मतदारसंघात भारत जोडो अभियान आता महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला भारत जोडो अभियानाची मिळालेली भक्कम साथ ही राज्यात महायुतीची चिंता वाढवणार का? हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.


राज्यात 150 तर विदर्भात 45 मतदारसंघात वैचारिक मशागत  


लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या पराभवामुळे उत्साहीत झालेल्या भारत जोडो अभियान मधील संघटनांनी आता विधानसभा निवडणुकांमध्येही सक्रिय भूमिका बजावण्याचे ठरवले आहे. 'भारत जोडो अभियान' च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील तब्बल 150 आणि विदर्भातील 45 विधानसभा क्षेत्रात भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघात विशेष समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. त्यामध्ये भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षातील कार्यकर्ते सोबत राहणार आहेत.


कार्यकर्त्यांना खास प्रशिक्षण


एवढेच नाही तर ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे कार्यकर्त्यांची फौज नाही, संघटन बळकट नाही, अशा ठिकाणी भारत जोडो अभियानातील तज्ञ महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांना खास प्रशिक्षणही देणार आहेत. या प्रशिक्षणात कोणत्या मतदारसंघात कोणते मुद्दे प्रभावी ठरू शकतात, त्या मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची हवा कशी काढायची, प्रतिस्पर्धी उमेदवारावर कोणते आरोप करायचे, कोणत्या ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्ष कमकुवत आहेत, कोणत्या समाज घटकात - जाती समूहात काम करण्याची गरज आहे याचा सखोल प्रशिक्षणही भारत जोडो अभियान मधील तज्ञ देणार आहेत. 


तर काही मतदारसंघात उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडीतील नेत्यांना भारत जोडो अभियान खास सल्ले ही देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फक्त आपले कार्यकर्ते आणि संघटनेच्या जोरावरच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही. तर अनेक सामाजिक संघटना भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून सक्रिय स्वरूपात महाविकास आघाडीसोबत निवडणूकीचे काम करणार आहे.


भारत जोडो अभियानाची भूमिका काय असणार?


- विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व 288 मतदारसंघात भारत जोडो अभियान महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहे. 


- महाराष्ट्रातील 150 आणि विदर्भातील 45 विधानसभा मतदारसंघात भारत जोडो अभियान सक्रिय भूमिका बजावणार आहे.


- सर्व मतदारसंघात खास समन्वय समिती स्थापन होणार.. त्यात भारत जोडो अभियानाचे प्रमुख कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते सोबत राहणार.


- महाविकास आघाडीचे संघटन कमकुवत असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना खास प्रशिक्षण दिले जाणार.


-वैचारिक प्रशिक्षणाशिवाय निवडणूक कशी लढवायची, कशा पद्धतीने बूथ मॅनेजमेंट करायचं याचे प्रशिक्षण दिले जाणार.


-विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी मधील पक्षांचा जाहीरनामा काय असावं, त्यात कोणते मुद्दे असले पाहिजे यामध्येही भारत जोडो अभियानातील तज्ञ योगदान करणार.


- काही मतदारसंघात उमेदवारांची निवड या प्रक्रियेमध्येही भारत जोडो अभियानाचा सल्ला घेतला जाणार आहे.


हे ही वाचा