Indian Army Bharti Rally : सैन्य भरतीसाठी 17 ते 26 एप्रिल दरम्यान ऑनलाइन सीईई परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान यावेळी पार पडलेल्या ऑनलाइन सीईई परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) छावणीतील सैन्य दलाच्या मैदानावर 25 जून ते 2 जुलैदरम्यान सैन्य भरती मेळावा होत आहे. तर सैन्य भरती मेळाव्याचा तयारीसंदर्भात आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. 


छावणीतील सैन्य दलाच्या मैदानावर 25 जून ते 2 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेली सैन्य भरती प्रक्रिया औरंगबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी, आदी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. तर ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावरून प्रवेशपत्रे डाऊनलोड करावे लागणार आहे. वैध प्रवेशपत्र, शपथपत्र आणि आवश्यक कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच भरतीच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष बसचे नियोजन केले आहे. 


कोणत्या तारखेला कोणता जिल्हा ?


औरंगाबाद 25 जून, जळगाव 26 जून, जालना आणि नांदेड जिल्ह्यांसाठी 27 जून, बुलढाणा 28 जून, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील ट्रेडमन आणि जनरल ड्युटी उमेदवारांनी 29 जून रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत. तर 29 जून रोजी अग्निवीर ट्रेडमन, आर्म्स करिता औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जळगाव आणि नांदेडमधील उमेदवारांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अग्निवीर टेक्निकल, क्लर्क, स्टोअर किपर क्लर्क, आदी पदासाठी अर्ज केलेल्या औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जळगाव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांकरिता 30 जून रोजी उपस्थित राहावे.


आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश


सैन्य भरती मेळाव्याचा तयारीसंदर्भात आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी सेना भरती संचालक कर्नल प्रवीणकुमार एस. जिल्हा सैनिक अधिकारी मेजर (निवृत्त) सय्यदा फिरासत, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या रॅलीविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व यंत्रणांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात. भरतीच्या ठिकाणी आरोग्य पथक, शीघ्र कृती दल तैनात करण्यात यावे आणि आवश्यक अन्य सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच भरतीसाठी शहरात येणाऱ्या तरुणांसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसचे नियोजन केले आहे. तर इतर विभागांकडून देखील या भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


संभाजीनगरमध्ये होणार 27 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम; महानगरपालिका करणार अंदाजे 150 कोटींचा खर्च