अमरावती : अमरावतीच्या मेळघाटातील खडीमल गावात आजपासून चार टँकरने पाणीपुरवठा (Amravati Water Issue) होणार आहे. खडीमल गावातील ग्रामस्थांचा पाण्यासाठी सुरु असलेला जीवघेणा संघर्ष कालच एबीपी माझानं दाखवला. माझाच्या बातमीची जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिलेत. तसंच येत्या सहा महिन्यात कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनीही ही माहिती दिलीय


हंडाभर पाण्यासाठी महिला, लहान मुली जीव धोक्यात घालत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर एबीपी माझाची टीम खडीमल गावात पोहोचली आणि पाणीटंचाईचं वास्तव जगासमोर आणलं. यानंतर जिल्हा प्रशासनाला खडबडून जाग आलीय.  पाण्याचे चार टँकर या गावात सुरू करण्यात आले असून पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या काळात 80 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. याची टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली असून वन विभागासोबत चर्चा करून त्यांच्या परवानगीनंतर वर्क ऑर्डर देऊन हे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.


 माझाच्या बातमीनंतर केवळ कागदोपत्री असलेली 80 लाख रुपयांची योजना आता प्रत्यक्ष साकार होणार असून येणाऱ्या काही दिवसांत खडीमल ग्राम पंचायती अंतर्गत चुनखडी, नवलगाव, बिच्चूखेडा आणि माडिझडप आणि इतर गावं देखील पाण्याच्या भीषण समस्येतून मुक्त होतील अशी अपेक्षा आहे. 


अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा विकासापासून कोसो दूर असलेला भाग आहे. या गावांमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षां नंतरही रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सोयी उपलब्ध नाहीत. खडीमल गावात आजही टँकरने पाणी पुरवठा होत असून नागरिकांना त्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी या गावासाठी 30 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता देण्यात आली मात्र अद्यापही ही योजना केवळ कागदावरच आहे. खडीमल ग्रामपंचायती अंतर्गत चुनखडी, नवलगाव, बिच्चूखेडा आणि माडिझडप ही इतर गावं देखील मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com  वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.