अमरावती : अमरावतीतील सावंगी मग्रापुरात तात्पुरती पाण्याची सुविधा एबीपी 'माझा'च्या बातमीनंतर करण्यात आली आहे. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आंदोलनस्थळी पाण्याचे टँकर घेऊन पोहचले. तसेच गावाला पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या उपसरपंचावर कारवाईचं लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे.  पाण्यासाठी गावं सोडलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आलंय.  त्यामुळे आता तीन दिवसांनी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं आहे.


अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर गावात वार्ड क्रमांक एक मधील गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याकारणाने गावकऱ्यांनी गावाच्या वेशीजवळ ठिय्या आंदोलन पुकारले.  बुधवारी रात्रीपासून गावावर बहिष्कार टाकला आणि गावाबाहेर आंदोलन सुरु केले. याची माहिती कळताच प्रशासन खळबडून जागे झाले. आंदोलकांनी रात्र गावाच्या वेशीवरच काढली, जो पर्यंत पाणी मिळणार नाही तो पर्यंत आता मागेच हटणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.  वार्ड नंबर एकमध्ये आम्ही दलित लोक राहतो म्हणून ग्रामपंचायत सरपंच - उपसरपंच यांनी आमचे नळ कनेक्शन कापले आम्हाला गेल्या 25  दिवसापासून प्यायला पाणी नाही आम्ही कसं जगावं असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.


याप्रकरणी सावंगी मग्रापूरचे उपसरपंच जुरावर पठाण यांनी माहिती दिली की, वस्तीतील पाईप लाईन तोडली त्यामुळे हा प्रकार घडला आणि ग्रामपंचायतीवरील आरोप हे चुकीचे आहे.  आता गावात पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही आंदोलन सुरूच आहे. सध्या प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू असून प्रशासनाकडून तात्पुरती पाईप लाईन टाकून पाणी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आंदोलकांनी मात्र कायमस्वरूपी उपाय करा अशी मागणी केली आहे.


संबधित बातम्या :