Agriculture News : शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध संकटांना सांमोरं जावं लागतं. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत असतात. पण या संकटाचा सामना करत काही शेतकरी उत्तम प्रकारची शेती करत आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं सातपुड्याच्या कुशीत  उत्तम प्रकारची स्ट्रॉबेरीची शेती (Strawberry Cultivation) फुलवली आहे. धिरसिंग फुसा पाडवी (Dhir Singh Phusa Padavi) असं शेतकऱ्याचे नाव आहे. अवघ्या तीन महिन्याच्या हंगामात एक एकर  स्ट्रॉबेरी शेतीतून पाडवी यांनी लाखो रुपयांचं उत्पादन घेतलं आहे. 


सध्या शेती परवडत नाही, आता शेतीत काही राहिलं नाही अशा गोष्टी अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतात. पण मात्र अशा सगळ्या गोष्टींना फाटा देत नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगात वसलेल्या डाब या गावातील एका शेतकऱ्यांने स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. शेतकरी धिरसिंग फुसा पाडवी यांचं कोणतेही शिक्षण झालं नसताना त्यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे. ते बालपणापासून कोणत्याच शाळेत शिकलेले नाहीत. पण त्यांनी जे प्रयोग आपल्या शेतीत केले ते उच्चशिक्षितांना जमणार नाहीत. ते सध्या एक एकर स्ट्रॉबेरी शेतीतून 6 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. 




हार न मानता शेतीत प्रयोग


धिरसिंग हे आपल्या शेतात पारंपरिक पीक घेत होते. पण त्यांना पाहिजे तस त्यातून उत्पन्न मिळत नव्हते. त्यांनी 2007 पासून आपल्या शेतात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग करण्याचं ठरवलं होते. मात्र, अपुरी माहिती आणि अयोग्य नियोजनाअभावी लागवड केलेला खर्च देखील त्यांचा निघत नव्हता. तरी त्यांनी हार न मानता आपला प्रयोग हा सुरू ठेवला. मग त्यांनी कृषी विभागाची मदत घेऊन माती परीक्षण केलं. स्ट्रॉबेरी पिकासाठी पोषक वातावरण असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी 2018 ला महाबळेश्वरमध्ये शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा केला. त्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने स्ट्रॉबेरी पिकाची लागवट करतात याचं प्रशिक्षण देण्यात आलं.




यावर्षी 6 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा


2021 साली त्यांनी एका एकरात 12 हजार स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. यासाठी त्यांनी 1 लाख 55 हजार एवढा लागवड खर्च आला. यातून  3 टन उत्पन्न मिळाले. त्यात धिरसिंग फुसा पाडवी यांना  4 लाख 50 हजार रुपयांचा नफा मिळाला. यावर्षी एका एकरात 6 टन उत्पन्न निघणार असून 6 लाख रुपये नफा मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. शासनाच्या नीती आयोगामार्फत स्ट्रॉबेरी शेतीसाठी सहाय्य केलं जातं. स्ट्रॉबेरी पिकवण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने एक कुलिंग व्हेन, कोल्ड स्टोरेज, पॅकेजिंग हाऊस ,स्ट्रॉबेरी पॅकिंग करण्यासाठी बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा लाभ आता स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी घेत आहेत.




नंदूरबारची स्ट्रॉबेरी विक्रीसाठी गुजरात राज्यात


योग्य नियोजन आणि परिश्रमाच्या जोरावर धिरसिंग यांनी स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केली आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून हा प्रयोग  यशस्वी झाला आहे. येथील स्ट्रॉबेरी नंदूरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरात राज्यात जात आहे. मालाचा दर्जा चांगला असल्यानं आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सद्या तोडणी सुरू असून जवळपास 6 लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शेतीत काहीच नाही म्हणणाऱ्यांसाठी धिरसिंग यांनी वेगळा संदेश देत शेतीतील स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Strawberry Farming : हिवाळ्यात 'स्ट्रॉबेरी' पिकातून मिळवा लाखोंचा नफा, कसं कराल स्ट्रॉबेरी शेतीचं नियोजन?