Agriculture News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचा फटका शेती पिकांना (Agricultural crops) बसत आहे. कापसासह, तूर, हरभरा, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळं रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain) देखील झाला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले असून, याचाही पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं ढगाळ वातावरण आहे. काल (5 जानेवारी) अनेक तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं जिल्ह्यातील हरभरा, तूर, कापूस आणि गहू या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आज मोठ्या प्रमाणावर दाट धुक्याची चादर पसरली असून, धुक्यामुळं हरभरा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळं पिकांवर पडत असलेल्या रोगराईमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे. अवकाळी पावसानंतर आज दाट धुक्याची चादर पसरलेली आहे. त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि इतरही मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अनेक भागात वाहने चालवणे सुद्धा कठीण झालेले आहे
गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात धुके, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता
गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात धुके पसरले आहे. त्यामुळं रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढत असताना सकाळी सर्वदूर धुके दाटले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा शहरात आज सकाळी सर्वाधिक दाट धुके दिसले. समोरचे दिसत नसल्याने वाहतूक संथ झाली होती. सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.
हिंगोली जिल्ह्यात धुक्याची चादर, हरभरा, गहू, तूर यासह आंब्याच्या बागा संकटात
हिंगोली जिल्ह्यांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीच्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. हिंगोलीचे तापमान 16 अंश सेल्सिअस वर पोहोचल्याने जिल्हाभरात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर जिल्हाभरात सर्वदूर धुक्याची चादर पसरली आहे. या संपूर्ण हवामानाच्या बदलाचा फटका शेतातील पिकांना बसत आहे. हरभरा, गहू, तूर यासह आंब्याच्या फळबागा संकटात सापडल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळं या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याच्या झाडांना लागलेला मोहर या ढगाळ वातावरणामुळं कमी होऊ शकतो. परिणामी उत्पादनात सुद्धा घट होऊ शकते. तर धुक्याच्या दाट चादरीमुळं दृश्यमानता कमी झाली आहे. सकाळीच हिंगोली शहरात जाणारे दूधवाले त्याचबरोबर गाड्यांच्या चालकांना वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.
बदलत्या वातावरणामुळं नांदेड जिल्ह्यात रब्बी पिकांना धोका
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर काही तालुक्यात झालेल्या हलक्या पावसामुळं हरभरा, तूर, गहू, ज्वारी या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या ढगाळ वातावरणामुळं बहरात आलेला आंबेमोहोर गळून आंबा फळबागेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. आज सकाळी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात दाट धुक्याची चादर पसरलीय. या धुक्यामुळे हरभरा, तूर, ज्वारी या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान या बदलत्या वातावरणामुळं पिकांवर रोगराई येऊन शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: