Raju Shetti : राज्यातील शेतकरी प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष नसल्याचे शेट्टींनी म्हटलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. 


Swabhimani Shetkari Saghtana : या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक


दिवसा वीज, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, मका, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई, तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.  बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी पैठणमध्ये पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.


... अन्यथा भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल


थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी करण्याचं सत्र राज्य सरकारनं चालवलं आहे. हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय प्रश्नांसाठी सदैव रस्त्यावरची लढाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत. बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांच्यावर लाठीमार करणारे कुणाच्या इशाऱ्यानं काम करत आहेत. तातडीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अन्यथा राज्यभरच याचा उद्रेक होईल असा इशारा शेट्टींनी दिला आहे. रासायनिक खतांच्या किंमती अवास्तव वाढल्या आहेत. केंद्र सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणत्याही उपायोजना करताना दिसत नाही. राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अन्यथा भारताची अवस्था श्रीलंकेसारखी झाल्याशिवाय राहणार नसल्याचे शेट्टी म्हणाले.


Rahu Shetti : राज्य सरकार विरुद्ध आमची आरपारची लढाई


दिवसा वीजेसाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून आंदोलन करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी अजून किती सोसायचं? ऊस तोडणी मुकादमाकडून शेतकऱ्यांची कोट्यवधी रूपये लुबाडले जात आहेत. बुडवणारे मोकाट फिरत आहेत. पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. कारखाने हात वर करतात. मात्र यामध्ये बळी शेतकऱ्यांचा जात असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं आता आमची सहनशिलता संपली आहे. राज्य सरकार विरुद्ध आमची आरपारची लढाई असणार असल्याचे शेट्टी म्हणाले. यावेळी एकूण सहा ठराव संमत करण्यात आले. 


राज्यकार्यकारिणी बैठकीतील ठराव



  1. थकीत विज बिलापोटी शेती वीज कनेक्शन तोडण्याचे सत्र सुरू आहे. ते ताबडतोब थांबवावे व संभाव्य विजदर वाढीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सक्त विरोध आहे.

  2.  कृषी संजीवनी योजनेस मुदत वाढ देऊन  ( 31 मार्चपर्यंत ) 50 टक्के वीज बिल भरून मागील विज बिल सर्व थकीत शेतकऱ्यांना मुक्त करावं.

  3. रासायनिक खतांच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्त पणाने प्रयत्न करावेत. अन्यथा भारताची अवस्था श्रीलंकेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही

  4.  ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी तक्रारी नोंदवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे विम्यांचे पैसे तातडीने देण्याचे विमा ( कंपनीना ) आदेश द्यावेत.

  5.  बुलढाणा येथील शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी.

  6. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर विज, कापूस, मका तोडणी, सोयाबीन दरवाढ, पीक विमा, कांद्याचे भाव, ऊसाची FRP, अतिवृष्टीचे नुकसान भरपाई या विषयावर रास्ता रोको करण्यात येईल.


महत्त्वाच्या बातम्या:


Raju Shetti : जनरल डायरने जन्माला घातल्यागत वागता, बळीराजा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल