Thane News Update : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली तरी देखील शिक्षणासाठी विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत असल्याचा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून समोर आलाय. एकीकडे हायटेक इंग्रजी शाळेत हव्या त्या सुख- सुविधा घेऊन शिक्षण घेणारी मुले तर दुसरीकडे शिक्षणाची इच्छाशक्ती असलेली गरीब आदिवासी मुले शिक्षणासाठी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता मरणाच्या वाटेतून प्रवास करुन शिक्षण घेत आहेत. अशीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असल्याचे समोर आले आहे.  


मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यातील अभयारण्यात सावरदेव ही एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत तीन विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर प्रवास करावा लागत असून दोन ते तीन किलोमीटर जंगलातून पायपीट करत तर उरलेला एका तासाचा जीवघेणा प्रवास पाण्यातून करावा लागतो. तोही कुठल्याही सुरक्षेची हमी नसलेल्या चार प्लास्टिक पाईप बांधून बनविलेल्या तारफ्यामधून. या विद्यार्थ्यांचे पालक दररोज आपला रोजगार बुडवत बाराही महिने पाल्यांना तानसा धरणातून जीवघेणा प्रवास करत शाळेत पोहचवून संध्याकाळी परत शाळेत घ्यायला येतात.


उपजीविकेसाठी कोणतीही साधन नसल्याने शासनाकडून मिळालेल्या वनपट्टा आणि मीठ-मसाल्यासाठी तलावातील मासेमारीसाठी अनेक आदिवासी कुटुंब तानसा धरणाच्या पाणलोट  क्षेत्रात वास्तव्य करत आहेत. मात्र येथे रस्ताच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र असे असताना देखील प्रशासनाकडून कोणतीही मदत या विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने हा जीवघेणा प्रवास त्यांना सातत्याने करावा लागत आहे. 


या विद्यार्थ्यांची व्यथा ऐकल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव तसेच शहापूर तालुका अध्यक्ष व पदाधिकारी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पोहोचले असून त्यांनी या तिन्ही विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचं काम करण्यात आलंय. शिक्षणासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. मात्र तरीदेखील अतिदुर्गम भागात विद्यार्थी या सर्व सुख सोयी सुविधांपासून वंचित राहतात. किमान महाराष्ट्र सरकारने या विद्यार्थ्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असून या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासनाकडून पाण्यातून प्रवास करण्यासाठी बोटची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Non Teaching Staff Agitation : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना फटका, अनेकांच्या प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या