Ajit Pawar : अवकाळी पावसामुळं (unseasonal rains) राज्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं आडवी झाली आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होणार आहे. यावेळी अजित पवार विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.
मागील सात आठ दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. केळी, द्राक्ष, आंबा संत्रा या फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. तर हरभरा, गहू, ज्वारी भाजपाला पिकांचेही मोठे नुकसान यामध्ये झाले होते. या नुकसानीमुळं बळीराजा पुरता कोलमडलाय. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारनं तातडीन मदत जाहीर करावी या मागणीसाठी अजित पवार हे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
अजित पवार यांच्या नेमक्या मागण्या काय?
- अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टर 50 हजारांची मदत द्यावी तर फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळावी
- पशुधनाच्या आणि घरांच्या नुकसानीसाठी NDRF च्या निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करावी
- वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या आणि पासर येथील घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना NDRF मधून चार लाखांची तर मुख्यमंत्री मदत निधीतून सहा लाख रुपयांची मदत मिळावी
- पीक कर्जासाठी सीबीलाची अट रद्द करण्यासंदर्भात केंद्राशी बोलून सरकारमार्फत रिझर्व्ह बँकेंच्या माध्यमातून बँकांसाठी सुस्पष्ट परिपत्रक काढावं
- पूर्व विदर्भातील टसर रेशीम शेती वाचवण्यासाठी शासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत.
या प्रमुख मागण्या अजित पवार आजच्या बैठकीत करणार आहेत. तसेच राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळं कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा होणार आहेत. तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावी अशी मागणी देखील करण्यात येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षापासून लढा सुरु आहे. याबाबत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, सरकारकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : अवकाळीचा तडाखा, एका तासात 20 ते 25 लाखांचं नुकसान; शेतकऱ्यानं सांगितला थरार