राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार, शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय


जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार आहे.  नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही.  शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तर नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. वाचा सविस्तर


आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; मुस्लीम समाजाने घेतला कुर्बानी न करण्याचा निर्णय


'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठूमय झालं असून अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. मात्र यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद (Bakra Eid) एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. दरम्यान अशा परिस्थितीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम एकतेचं उदाहरण पाहायला मिळाले आहे. तर मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. वाचा सविस्तर


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करा : छगन भुजबळ 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांमध्ये संघटनात्मक बदल पाहायला मिळाले. दोन कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यातच आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेतेपद जर मराठा समाजाकडे असेल तर प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी किंवा लहान समाजाकडे हवे असं छगन भुजबळ म्हणाले. वाचा सविस्तर


वांद्रे पूर्वमधील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर बीएमसीची कारवाई, बांधकाम पाडलं


मुंबईतील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली आहे. वांद्रे पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं. ते बांधकाम आज मुंबई महापालिकेकडून पाडण्यात येत आहे. कोणतीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून तिथे बोर्ड लावण्यात आले होते, शिवाय कार्यालय तयार करण्यात आलं होतं. त्यावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. वाचा सविस्तर


माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे राहुलचे करु द्या; दर्शनाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया...


दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर दर्शना पवार हिच्या आईने आणि भावाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याने माझ्या बहिणीचा घात केला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या भावाने व्यक्त केली आहे तर माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, अशा शब्दांत तिच्या आईने संताप व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर