Ashadhi Ekadashi 2023 : 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठूमय झालं असून अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. मात्र यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद (Bakra Eid) एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे. दरम्यान अशा परिस्थितीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम एकतेचं उदाहरण पाहायला मिळाले आहे. तर मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. 


अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. तर 29 जूनला आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. दरम्यान याच दिवशी मुस्लीम समजाचा बकरी ईदचं देखील सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सद्याची राज्यातील परिस्थिती पाहता एकाच दिवशी येणारे हे दोन्ही सण शांतेत साजरे करण्यात यावेत असा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या वाळूज पोलिसांनी वाळूज भागातील पंढरपूर येथे असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शांतता समितीची बैठक बोलावली होती. यावेळी झालेल्या बैठकीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लीम समाजाकडून घेण्यात आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचं देखील या बैठकीत निर्णय झाला. 


पंढरपूरा येतात लाखो भाविक...


वाळूज भागात असलेल्या पंढरपूर गावात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून, आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे पासूनच जिल्ह्याभरातून भाविक पंढरपूर गावात दाखल होत असतात. विशेष म्हणजे या दिवशी शेकडो दिंड्या देखील येतात. त्यामुळे पोलिसांचा देखील मोठं बंदोबस्त असतो. मात्र याच दिवशी बकरी ईद सुद्धा असल्याने कुर्बानी न करण्याचा निर्णय स्थानिक मुस्लीम समाजातील नागरिकांनी घेतला आहे. या निर्णयाची जिल्हाभरात चर्चा पाहायला मिळत आहे. तर कौतुक देखील होत आहे. 


यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी असल्याने मुस्लीम समाजाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करावी अशी विनंती छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केली होती. दरम्यान यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पोलिसांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या बैठकीत मुस्लीम बांधवानी मोठ मन दाखवत आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत मौलाना आणि सर्वच मस्जिदचे प्रमुख यांच्या माध्यमातून हे आवाहन मुस्लीम समाजापर्यंत पोहचवले जाणार आहे. (अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक)


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ashadhi Wari 2023: ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष! गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन