Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील आरोपी अमरेंद्र मिश्राने (Amrendra Mishra) जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Session Court) धाव घेतली असल्याचे समजत आहे. मात्र मिश्रा याच्या जामिनास अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी विरोध दर्शविला आहे.  या प्रकरणी न्यायालयाने 5 मार्चपर्यंत सुनावणी तहकूब केलीय.


मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा पोलिसांच्या ताब्यात


ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबूक लाईव्हमध्ये गोळीबार झाला. आणि एकच खळबळ उडाली. त्यांची गोळीबाराची व्हिडीओ क्लिप वाऱ्यासारखी व्हायरल झाली. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. तर वैयक्तिक वैमनस्यातून घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिसने देखील स्वत:ला गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यावेळी या दोघांनी समाजासाठी एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. या प्रकरणात मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.


 


पोलिसांकडून चौकशी


आरोपी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा काही महिन्यांपूर्वीच वैयक्तिक सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मात्र या प्रकरणा नंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. अमरेंद्र हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. आरोपी अमरेंद्र मिश्राने पिस्तुलाचा परवाना उत्तर प्रदेशातून काढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडील पिस्तुलाची नोंदणी मुंबईत करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अमरेंद्रने भाईंदर पोलिसांकडे जमा केलेला शस्त्रपरवाना खरा आहे की नाही, याची पडताळणी करायची आहे, असे पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले होते. उत्तर प्रदेश सरकारने आपल्याला शस्त्रपरवाना दिला आहे, असे मिश्राचे म्हणणे होते. त्याशिवाय बंदुकीच्या बदल्यात मॉरिसने अमरेंद्रला काही पैसे दिले होते का? अमरेंद्रने त्याच्या परवान्याची नोंद मुंबई पोलिसांकडे का केली नाही? तसेच त्याने त्याचे वेतन व अन्य बाबींची नोंद पोलिसांकडे का केली नाही? अशा अनेक प्रश्नांची चौकशी पोलीस करत आहेत.


 


मिश्राने मुंबईतही पिस्तुलाची नोंदणी करणे आवश्यक होते


मिश्रा तीन ते चार महिन्यापासून मॉरिसकडे अंगरक्षक म्हणून काम करत होता. नियमानुसार मिश्राने मुंबईतही पिस्तुलाची नोंदणी करणे आवश्यक होते, असे पोलिसांनी सांगितले. मॉरिसने वापरलेले पिस्तुल त्याचा सुरक्षा रक्षक अमरेंद्र मिश्रा याचे आहे. त्यामुळे मिश्राला अटक करण्यात आली आहे. मिश्राने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील फूलपूरमधून 2013 मध्ये पिस्तुलाचा परवाना घेतला होता. असे मिश्राचे म्हणणे आहे


 


हेही वाचा>>>


Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, तिकडे मॉरिस एकटा नव्हता, तिसरा व्यक्तीही होता? सुषमा अंधारेंचा सवाल