Nagpur Crime नागपूर: 'सीएसआर' फंडाच्या नावाने अधिक पैशांचे आमिष दाखवून मुंबईतील काही व्यक्तीनी मिळून नागपूरातील (Nagpur Crime )एका व्यापाऱ्याची 1 कोटींनी फसवणूक (Crime) केली. ही घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस (Nagpur Police) ठाण्याच्या हद्दीत घडली. यात तथाकथित टाटा कंपनी एका एनजीओला 460 कोटी रुपये देणार असून, त्यातील 400 कोटी कॅशमध्ये परत घेणार आहे. त्यातील उर्वरित 60 कोटी रुपयांपैकी अर्धे पैसे देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे राजकारण्यांच्या पैशांचे व्यवहार सांभाळण्याचा दावा करणाऱ्या एका संशयित आरोपीने थेट गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचादेखील वापर करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
'सीएसआर' फंडाच्या नावाखाली फसवणूक
मो. गुलशाद मो. हनिफ बहणा (38, रा. इंदोरा चौक), असे तक्रारदाराचे नाव असून ते कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात. एका मित्राच्या माध्यमातून त्यांची ओळख मुंबईतील अॅलेक्स मिरांडा आणि त्याची पत्नी एंजल मारिया डिचुना (अंधेरी पूर्व, मुंबई) यांच्याशी झाली. यात त्यांनी आपण एंजल फाउंडेशन नावाने एक एनजीओ चालवत असल्याचे सांगितले. काही दिवसात आमच्या एनजीओ टाटा कंपनीकडून 460 कोटी रुपयांचा फंड मिळणार असून, त्यातील 400 कोटी कंपनीला कॅशमध्ये परत करायचे आहे. तर उरलेल्या 60 कोटींपैकी 30 कोटी रुपये तुम्हाला देण्यात येतील, अशी त्यांनी बतावणी केली. त्यासाठी मो. गुलशाद यांना देखील यात गोवल्या गेले आणि त्यांना एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यांना विश्वास बसावा यासाठी एनजीओची वेबसाइटदेखील दाखविली. दरम्यान त्यांनी टाटा कंपनीतील एका तथाकथित अधिकारी असलेल्या पंकजशी देखील भेट करवून दिली.
व्यापाऱ्याला 1 कोटीचा गंडा
मो. गुलशाद यांनी त्यांच्या बतावणीवर विश्वास दाखवला आणि आपल्या जाळ्यात ते फसल्याचे लक्षात येताच फसवणूक करणाऱ्यांनी 26 मे 2023 ला आर.पी. ट्रेडर्सच्या नावाने 30 लाखांचा डीडी घेतला. यानंतर संशयित आरोपींनी त्यांची भेट प्रशांत बेडसे (टिटवाळा पूर्व, कल्याण) याच्याशी करवून दिली. प्रशांतने तो अनेक राजकीय नेत्यांचे कॅशचे व्यवहार सांभाळत असल्याची बतावणी केली. आपल्याला देखील यात अधिक फायदा होईल असे गुलशाद यांना संगण्यात आले आणि त्यांना 70 लाख नगद रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, गुलशाद यांच्या कडे कॅश रक्कम नसल्याने त्यांनी धनादेशाच्या माध्यमातून पैसे देण्याची तयारी दाखविली. त्यावर प्रशांतने गुलशाद यांना भारत पेह फाउंडेशनच्या खात्यात पैसे टाकायला सांगितले. त्याच्याच सांगण्यावरून 30 लाखांचा डीडी रद्द करून ते पैसेदेखील भारत पेह फाउंडेशनच्या खात्यात टाकण्यात आले.
फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
त्यानंतर लवकरच तुमच्या खात्यात 30 कोटी रुपये पोहोचतील अशा दावा प्रशांतने केला. मात्र बराच काळ निघून गेला तरी पैसे खात्यात आलेच नाहीत. याबाबत गुलशाद यांनी विचारणा केली असता, पंकजला दिल्लीत सीबीआयने पकडले असून, आता सध्या तो पैसे मिळणार नाहीत असे तीनही संशयित आरोपींनी सांगितले. त्यानंतर गुलशाद यांनी पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुलशाद यांनी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक करणाऱ्याविरोधात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून यातील आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आह.
इतर महत्वाच्या बातम्या