Chhagan Bhujbal : महाराष्ट्रातील समाज सुधारकांनी देशाला दिशा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shiwaji Maharaj), महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णासाहेब कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (BR Ambedkar) यांच्या सारख्या अनेकांनी केले. मागासवर्गीय पिडित शोषितांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही कायम आहे. सत्ताधारी आपले अपयश लपविण्यासाठी व सत्ता टिकविण्यासाठी जाती-धर्माचा अफुच्या गोळीसारखा वापर करीत असल्याचा आरोप छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. 


छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यवतमाळ (Yawatmal) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, एकंदरच राज्यात थोरपुरुषांबाबत अवमाननाकारक उद्गार काढणारे सत्तेत आहेत. जाणीवपूर्वक असा भ्रम पसरविला जात आहे. सत्ताधारी आपले अपयश लपविण्यासाठी व सत्ता टिकविण्यासाठी जाती-धर्माचा अफुच्या गोळीसारखा वापर करीत आहे. जनतेला या नशेत ठेवून स्वत:ची सत्ता राखण्याचा खटाटोप सुरू आहे. ओबीसीची (OBC) स्वतंत्र जणगनणा व्हावी ही मागणी आजही पूर्ण झालेली नाही. या उलट ओबीसींच्या आरक्षणाला भाजपातीलच काही मंडळींनी 2027 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचा हक्क कायम रहावा, स्वतंत्र जनगणना व्हावी या मागणी घेवून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाबाबत न्यायालयाने इम्पीरिकल डाटाची मागणी केली. 2016 मध्ये हा डाटा केंद्रातील मोदी सरकारच्या ताब्यात देण्यात आला. त्यात काही चुका असल्याचे सांगितले गेले. मात्र याच डाटाच्या आधारे उज्वला गॅस योजना, घरकुल योजना राबविल्या. इतकेच नव्हे तर रोहिनी कमिशनलाही हा डाटा उपलब्ध करून देण्यात आला. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडे या डाटाची मागणी केली असता तो डाटा देण्यात आला नाही. 2021  मध्ये कोरोना महामारीमुळे जनगणना झाली नाही. अशा अनेक अडचणी मागासवर्गीयांच्या बाबत जाणीवपूर्वक उभ्या केल्या जात आहे. आता शिक्षणातही धार्मिकीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. ही बाब लोकशाहीला बाधक ठरणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


ते म्हणाले की, विद्यापीठातही सोईची लोक बसविण्याचा सपाटा सुरू असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. बहुजन समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर येण्याची गरज आहे. तरच अपेक्षित हक्क व विकास साधता येईल, असेही छगन भुजबळ म्हणाले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या, महागाई, बेरोजगारी या विषयाला घेवून राष्ट्रवादी मोर्चाचे आयोजन करणार आहे. हा मोर्चा नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनावर धडक देणार आहे. या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.