Nashik News : गेल्या अनेक वर्षांपासून बारगळलेला किकवी धरणाचा (Kikavi) प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता असून आगामी अर्थसंकल्पात त्याचा समावेश होण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक असल्याने आगामी बजेटमध्ये या प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने 50 काेटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. 


गंगापूर धरणातून (Gangapur Dam) नाशिक (Nashik) शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता ब्राह्मणवाडे परिसरात किकवी धरणाचा प्रस्तावित प्रकल्प आहे. मात्र गेल्या काही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी किकवी प्रकल्प लवकरच साकार होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या धरणामुळे नाशिककरांचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न मिटणार आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील प्रस्तावित किकवी धरणाचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे तसेच येत्या बजेटमध्ये किकवी धरण उभारण्याच्या कामासाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. 


त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे किकवी धरण प्रस्तावित करण्यात आले आहे. या धरणाची 1596 दलघफू साठवण क्षमता असून ते सर्व पाणी नाशिक शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जाणार आहे. या प्रकल्पास राज्य सरकारने 23 ऑगस्ट 2009 रोजी 283  कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर 4 डिसेंबर 2012 ला पाटबंधारे विभागाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक कार्यालयाकडून धरणाच्या आराखड्यास मंजुरीही दिली. त्यानंतर या धरणाच्या कामाबाबत काहीही प्रगती झालेली नाही. नाशिक शहरास प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होत असून उर्वरित मुकणे व दारणामधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र किकवी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 


गंगापूर धरणावर शेतीसाठी आरक्षण असल्यामुळे भविष्यातील वाढीव लोकसंख्येला गंगापूर धरण अपुरे पडणार आहे. दारणा धरणातून भविष्यातील वाढीव नाशिकला पाणीपुरवठा करण्यास मर्यादा असून मुकणे धरणातून केवळ 1.5 टीएमसी पाणी आरक्षित आहे. यामुळे नाशिक शहराला पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी किकवी धरण प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी जवळपास 912 हेक्टर जमीनीची पाहणी करण्यात आली असून यामध्ये 172.47 इतकी जमीन वनखात्याच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्यास नाशिकचा पाणीप्रश्न सुटणार आहे. 


यापूर्वी महाविकास आघाडीकडून किक 
दरम्यान किकवी धरण प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडेलला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील किकवी धरणाबाबत महत्वाची घोषणा केली होती. त्यावेळी किकवी धरणाची आधीची निविदा रद्द करण्यात येऊन सदर प्रकल्पाची निविदा जलसंपदाच्या वतीने नव्याने काढली होती. मात्र सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा विषय मागे पडला. मात्र खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले. त्यानंतर आगामी बजेटमध्ये या प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने 50  काेटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. त्यामुळे आतातरी हा प्रकल्प मार्गी लागणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.