मुंबई: महादेव बेटिंग अॅप प्रकरणी (Mahadev Betting App) त्याच्या प्रमोटर्सच्या अडचणीत वाढ होणार आहे. या प्रकरणातील आरोपी रवी उप्पलला भारतात आणण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहे. विशेष न्यायालयात त्याला प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणण्याची महत्त्वाची कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता संबंधित कागदपत्रे ही दुबईच्या न्यायालयाला देण्यात येणार आहेत. 


इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसमुळे ईडीच्या तपास प्रकरणात रवी उप्पलला बराच काळ दुबई तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अशा प्रकरणात अटकेच्या नियमांनुसार, भारतीय दूतावासाने दुबई न्यायालयात प्रत्यार्पणाची कार्यवाही 60 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागते. त्यानंतरच त्याला भारतात आणता येईल.


सध्या रवी उप्पलला 32 दिवसांपासून दुबई तुरुंगात ठेवण्यात आले आहे. रायपूरच्या विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी केंद्रीय एजन्सी बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहे.


परदेशातून गुन्हेगार आणण्याची प्रक्रिया


याबाबत ईडीचे विशेष सरकारी वकील डॉ.सौरभ पांडे म्हणाले की, न्यायालयाने प्रत्यार्पणाचा अर्ज स्वीकारला आहे. पीएमएलए कलम 59 अन्वये प्रत्यार्पणाबाबतचा हा आदेश मान्य केल्यानंतर अरबी लिपीत लिहिलेल्या कागदपत्रांची प्रत विशेष न्यायालयात सादर करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने दुबई येथील सक्षम न्यायालयाकडे प्रत्यार्पणासाठी विनंती पत्र जारी केले आहे.


दुबईतील न्यायालय संमती देणार


ईडी हे संपूर्ण कायदेशीर रेकॉर्ड परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द करेल, त्यानंतर ते परराष्ट्र मंत्रालयाकडून दुबईतील भारतीय उच्चायुक्तांकडे सुपूर्द केलं जाईल. भारतीय उच्चायुक्तालय हे दस्तऐवज दुबईच्या सक्षम न्यायालयात सादर करेल, त्यानंतर दुबई न्यायालयाकडून प्रत्यार्पणासाठी कायदेशीर संमती दिली जाईल.


राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ 


ईडीच्या या कारवाईनंतर राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.  छत्तीसगडसह देशभरात ऑनलाइन सट्टेबाजीच्या या मोठ्या घोटाळ्यात रवी उप्पल यांच्याकडून पैसे कधी आणि कसे हस्तांतरित केले गेले याची माहिती ईडीला मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळेच या प्रकरणाशी संबंधित अनेक ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांच्या अडचणीही वाढू शकतात.


ही बातमी वाचा :