Supriya Sule Whats App Status :  शिवसेना आमदार अपात्रता निकाल सुनावणीचा निकाल (MLA Disqualification Case) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सुनावला. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवले. त्याशिवाय, विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गट हाच शिवसेना असल्याचा निकाल दिला. नार्वेकर यांच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. सुप्रिया सुळे यांनी या निकालानंतर व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवले. त्यांच्या या व्हॉट्सअॅप स्टेट्समुळे चर्चांना उधाण आले आहे. 


सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये काय?


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवला असल्याचा फोटो सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोबायोग्राफीच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यानचा हा फोटो आहे. 


शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चांगली मैत्री होती. फोटोबायोग्राफीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मैत्रीचे किस्सेही सांगितले होते.




सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा अर्थ काय?


आमदार अपात्रता सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गट हाच शिवसेना असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला. सुप्रिया सुळे यांनी स्टेट्सला ठेवलेल्या फोटोचा अर्थ हा शरद पवार आणि त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सूचित केले. शरद पवार हे बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीला विसरणार नसून उद्धव यांच्या पाठिशी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न सुप्रिया यांनी केला आहे. 


सुप्रिया सुळे यांनी अध्यक्षांच्या निकालावर काय म्हटले?


'खोदा पहाड और निकला चुहा' असा निकाल असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. संविधानाचा अपमान संविधानाची चेष्टा आज करण्यात आली आहे. या सरकारने पोरखेळ केला आहे. पक्ष फोडा, घरं फोडा कोर्ट केसेस असे प्रकार सध्या सुरू आहे. सरकार कन्फ्युज असल्याचे सुळे यांनी म्हटले. 


पक्ष कुणाचा तर उद्धव ठाकरे यांचा आहे. बाळासाहेब हयात असताना उद्धव ठाकरे यांना पक्ष देण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या बॅनर खालीच हे सर्व आमदार आणि मंत्री झाले. भाजपच हे महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.  अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी टाळाटाळ करत होते मात्र त्यांना निर्णय घ्यायला सुप्रीम कोर्टाने भाग पाडलं. आता महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम सुप्रीम कोर्ट करेल, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.