राज्यभरात मोठा रोष
महाराष्ट्र बियाणे महामंडळ अर्थात 'महाबीज'. संपूर्ण खरीप हंगामात महाबीजचं सोयाबीन बियाणं वादग्रस्त ठरलं आहे. राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही. राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांवर यामूळे दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. यासंदर्भात महाबीजसह सोयाबीन इतर खाजगी बियाणे कंपन्यांच्या विरोधात राज्यभरात मोठा रोष निर्माण झाला होता. महाबीजनं तक्रारीनंतर सरकारच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना बियाणं बदलवून दिलं. मात्र, संपुर्ण नुकसान भरपाईची मागणी करणार्या शेतकऱ्यांना बियाणे रक्कम परताव्याचा निर्णय महाबीजनं घेतलाय. मात्र, शेतकऱ्यांनी या निर्णयावर टिका केली आहे.
सोयाबीन बियाणे उत्पादक, विक्रेत्यांवर पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करू नये : सर्वोच्च न्यायालय
700 क्विंटल बियाणं शेतकऱ्यांनी बदलून घेतलं
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी 'महाबीज' 2.93 लाख क्विंटल सोयाबीन बियाणं बाजारात आणलं होतं. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त 50 टक्केच बियाणं 'महाबीज'नं बाजारात आणलं होतं. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी महाबीजसह इतर खाजगी कंपन्यांचं सोयाबीन बियाणं उगवलंच नाही. यानंतर सरकारं याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तालुकास्तरीय चौकशी समित्या नेमल्यात. सरकारनं तक्रारदार शेतकऱ्यांना बियाणं बदलवून देण्याचा निर्णय घेतला. यानुसार महाबीजनं 3250 क्विंटल बियाणं यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं होतं. यातील 700 क्विंटल बियाणं शेतकऱ्यांनी बदलून घेतलं होतं. काही शेतकऱ्यांनी बियाणे बदलून घ्यायला नकार दिला होता. अशा तक्रारदार शेतकऱ्यांना बियाण्याची रक्कम परत करण्याचा निर्णय 'महाबीज' प्रशासनानं घेतला आहे.
Mahabeej | 'बियाणे न उगवायला केवळ बियाणांना दोष का द्यायचा?', महाबीज संघटनेच्या उलट्या बोंबा
रक्कम होणार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. महाबीजनं आतापर्यंत बियाणे रक्कम परताव्याचे 19 लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. महाबीज मुख्यालयानं प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींची माहिती आणि बँके खात्याचं विवरण मागितलं आहे. अकोल्याच्या महाबीज मुख्यालयात सध्या ही माहिती गोळा करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, 'महाबीज' रक्कम परतावा मिळणाऱ्या शेतकर्यांचा आकडा सांगण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे.
यवतमाळ जिल्ह्याचा 'महाबीज' मुख्यालयाकडे नुकसान भरपाईसाठी 35 लाखांचा प्रस्ताव
यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगविल्याच्या सहा हजारांवर तक्रारी आल्या आहेत. यात 'महाबीजच्या बियाण्यांचा समावेश आहे. पेरणीच्या हंगामात महाबीज 45 क्विंटल बियाणे बदलून दिले आहे. आता पेरणीचा हंगाम निघून गेल्याने महाबीजने शेतकऱ्यांयांना बियाणे रक्कम परत देण्यासाठी 35 लाख रूपयांचा पहिला प्रस्ताव मुख्यालयात पाठविला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील नऊ लाख हेक्टरपैकी साडे आठ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास दोन लाख 19 हजार हेक्टरवर यंदा सोयाबीनचा पेरा झाला आहे.
राज्यभरात झालं होतं 'महाबीज'विरोधात आंदोलन
यावर्षी 'महाबीज' बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नानंतर राज्यभरात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनं केली होती. लातूरमध्ये 'मनसे'नं 'महाबीज'च्या जिल्हा कार्यालयात तोडफोड केली होती. तर 9 जुलै रोजी अकोल्यातील महाबीज मुख्यालयात युवक काँग्रेसनं मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या कक्षात सोयाबीन फेकलं होतं. मुख्य विरोधी पक्ष भाजपनं थेट रस्त्यावरचं आंदोलन केलं नसलं तरी विधीमंडळातील दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी सरकारकडे सातत्यानं यासंदर्भात बाजू मांडली.
काँग्रेस, शेतकरी संघटनेची संपूर्ण नुकसान भरपाईची मागणी
दरम्यान, काँग्रेस आणि शेतकरी संघटनेनं 'महाबीज'च्या या निर्णयावर टीका केली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी महाबीजनं संपुर्ण भरपाई न दिल्यास युवक काँग्रेस परत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला. तर शेतकरी संघटनेच्या 'सोशल मीडिया' आघाडीचे प्रमुख विलास ताथोड यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी सरकार आणि महाबीजकडे केली आहे.
'एबीपी माझा'चा सातत्यानं पाठपुरावा
या संपूर्ण प्रकरणात 'एबीपी माझा'नं राज्यभरातून सातत्यानं पाठपुरावा केला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी यामुळे कसा देशोधडीला लागला याचं वृत्तांकन 'माझा' सातत्यानं सरकार आणि जनतेसमोर मांडलं आहे. निर्णयामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 'एबीपी माझा'चे आभार मानले आहेत. 'बियाणं असेल दमदार, तर पीक येईल जोमदार' ही 'महाबीज'ची 'टॅगलाईन' आहे. महाबीज'ने जुन्या चुका टाळत विश्वासहार्य बियाणे शेतकऱ्यांना पुरविणे आवश्यक आहे. तरच जनतेच्या मालकीचं हे महामंडळ खऱ्या अर्थाने अधिकाधिक लोकाभिमुख होईल, यात तिळमात्रही शंका नाही.