पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे पंढरपुरात माघी यात्रा कालावधीसाठी संचारबंदी जाहीर झाली आहे. तरीही राज्यभरातून दिंड्या पंढरपुरात दाखल होऊ लागल्याने पोलिसांनी शहरातील 1200 पेक्षा जास्त मठ व धर्मशाळांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे कोणत्याही दिंड्या अथवा वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश नसल्याने या वारकऱ्यांचे निवासाचे ठिकाण असलेले शहरातील मठ व धर्मशाळांनी कोणत्याही भाविकाला निवासासाठी थांबवू नये, अशा स्वरूपाच्या या नोटीस असून यात्रेपूर्वी शहरात दाखल झालेल्या हजारो भाविकांना बाहेर काढणे ही प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
यासाठीच सर्व धर्मशाळा व मठाना अशा नोटीस दिल्या जात आहेत. माघी यात्रेत भाविकांना रोखण्यासाठी कोल्हापूर रेंजमधून जवळळपास 700 पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असून यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 80 अधिकारी असणार असल्याचे पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
विठ्ठल मंदिरात दर दोन तासांनी सॅनिटायझेशन
राज्यात कोरोनाचे वाढते संकट पाहून माघी यात्रेसाठी मंदिर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. सध्या रोज येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर दोन तासाला विठ्ठल मंदिर सॅनिटायझेशनला सुरुवात करण्यात आली आहे. माघी एकादशी 23 फेब्रुवारीला होणार असली तरी विठ्ठल मंदिर 21 फेब्रुवारीच्या रात्री दहा वाजता भाविकांसाठी बंद होणार असून 24 तारखेला पहाटे सहा वाजता पुन्हा कोरोनाचे नियम पाळून भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. यात्रेला मंदिर बंद राहणार असल्याने सध्या रोज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला दर्शनासाठी येत असल्याने दार दोन तासांनी संपूर्ण विठ्ठल मंदिर, दर्शन रांग, विठ्ठल रुक्मिणी गाभारा याला सॅनिटायझेशन केले जात आहे. दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर मारून आणि मास्क पाहूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. सुरुवातीला भाविकांची थर्मल स्कॅनिंग व प्लस ऑक्सिमीटरच्या साहाय्याने तपासणी देखील केली जात आहे. माघी एकादशीच्या विठ्ठल व रुक्मिणी पूजेला केवळ पाच जणांना परवानगी दिली असून यांनाही मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.