रायगड : शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई अपमानकारक असल्याची छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांची टीका ही दुर्भाग्यपूर्ण असल्याची खंत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. किल्ले रायगडावर शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यानिमित्त रायगडावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यासाठी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमार्फत प्रथमच दोन दिवस प्रकाश योजना करण्यात आली.


यावेळी, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आल्याने छत्रपतींचे वारस असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खंत व्यक्त केली. यामध्ये, किल्ले रायगडावरील विद्युत रोषणाई ही अपमानकारक असून 'डिस्कोथेक' शिवजयंतीचा हा दिवस भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासातील 'काळा दिवस' म्हणून गणला जाणार असून असल्याची टीका त्यांनी केली आहे.


शिवजयंतीचा हा दिवस प्रत्येकासाठी अभिमानाचा दिवस असून खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनमार्फत प्रामाणिक भावनेने विद्युत रोषणाई करण्यात आली असून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केलेली टीका ही दुर्भाग्यपूर्ण असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.


तर, यावेळी मेघडंबरी आणि राजसदरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई संदर्भात कोणतंही राजकारण करण्यात आलं नसल्याचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. यासाठी, दृष्टिकोन बदलण्याची गरज असून सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असून किल्ले रायगडावरील विद्युत रोषणाईची अनुभूती घेणे आवश्यक असल्याचेही शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी किल्ले रायगडावरील राजसदर, समाधी स्थळ, होळीचा माळ येथे वर्षभर विद्युत रोषणाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी , पुरातत्व खात्याला आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याचे ही खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.


खासदार संभाजीराजे छत्रपतींनी काय म्हटलं?


भारतीय पुरातत्त्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो.


शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाई वरून खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारलं