Chandrakant Patil : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha Election) महायुती समन्वय बैठकीसाठी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे टेंभुर्णीत आले होते. यावेळी पाटील बोलताना एका शेतकऱ्याने (Farmers) भर सभेत त्यांना जाब विचारला. केंद्र सरकारमुळं (Central Govt) माझे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर माढा तालुक्यातील शेतकऱ्याचं 20 कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचं शेतकऱ्याने सांगितलं. संपतराव काळे असं माढा तालुक्यातील सुर्ली येथील शेतकऱ्याचं नाव आहे.
माढा तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी पाटील यांचे भाषण सुरु होते. यावेळी संपतराव काळे या शेतकऱ्याने आपले आयुर्वेदिक वनस्पती लागवडमध्ये 22 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. केंद्र सरकारनं परवानगी दिलेल्या कंपनीमुळं हा तोटा झाल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं. याला केंद्र सरकार जबाबदार आहे असंही ते म्हणाले. यावेळी चांगलाच गोंधळ उडाला. यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले भाषण थांबवत सभा गुंडाळली.
आमची फसवणूक केली तुम्हाला अपेक्षीत मत पडणार नाहीत : शेतकरी
भाजपने 400 पार चा नारा दिला आहे. त्यामुळं प्रत्येक बुथवर 500 पैकी 370 मते कमळाला पाहिजेत असे पाटील म्हणाले. यानंतर संपतराव काळे यांनी असे काही घडणार नाही, आमची फसवणूक केल्याचा आरोप केला. यानंतरही चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. भाजप व महायुतीचे कार्यकर्ते त्याला खाली बसवू लागताच चंद्रकांत पाटील यांनी त्यांना बोलू देण्यास सांगितले. गोंधळ वाढत जाताच तुम्ही कोणत्या पक्षाचे असा सवाल पाटील यांनी शेतकऱ्याला केला. आम्ही सोडलेल्या मतात तुम्ही आहात असे पाटील यांनी सांगितले. हा सर्व गोंधळ टिव्ही कॅमेऱ्याने घेतला आता तुमचे काम झाले असेल तर खाली बसा असे चंद्रकांत पाटील शेतकऱ्याला म्हणाले. यानंतर पोलीस व महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याला ओढून बाहेर नेले. तसेच या शेतकऱ्याला धक्काबुक्की केल्याचीही माहिती मिळतेय.
नेमकं प्रकरण काय?
केंद्र सरकारच्या सांगण्यावरुन माढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना आयुर्वेदीक शतावरी या वनस्पतीची लागवड केली होती. याबाबत शेतकऱ्यांच्या तत्कालीन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत बैठक देखील झाली होती. मंत्री महोदयांच्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांनी शतावरीची लागवड केली होती. दरम्यान, शेतात शतावरी आल्यानंतर हर्बल कंपनीने ती शेतावरी नेली. मात्र, शेतकऱ्यांची अद्याप देणी दिली नसल्याची माहिती शेतकरी संपतराव काळे यांनी दिली. याबाबत खासदार रणजितसिंह निंबाळकरांना देखील भेटलो होतो. मात्र, त्यांनी देखील दखल घेतली नसल्याची माहिती शेतकरी काळे यांनी दिली. तसेच शेतकऱ्याने माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर आरोप केला. माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.