रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर त्याचा नुकसानीचा आकडा आता जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला आहे. यावेळी जिल्ह्याचं जळपास 30 कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामध्ये महावितरण, मच्छीमार, कृषी, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक मालमत्ता यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळावेळी जिल्ह्यात 152. 43 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली होती. त्यानंतर आता वर्षभराच्या आतच तोक्ते चक्रीवादळ आलं आणि किनारपट्टी भागात मोठं नुकसान झालं. त्याचा आकडा हा आता 30 कोटींचा असल्याचं जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला कळवलं आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता मिळणाऱ्या मदतीची प्रतीक्षा आहे. अद्याप शासनाकडून एक रुपयाची मदतही बाधितांना दिलेली नाही. आपल्या कोकण दौऱ्यावेळी पंचनामे सादर झाल्यानंतर मदत जाहीर करु, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यामुळे जिल्ह्याला नुकसान भरपाई कधी देणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
 
किती झालं आहे नुकसान? 
रत्नागिरी जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आकडा राज्य सरकारला सादर केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 30 कोटींचं नुकसान झालं आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकमवार यांनी याची माहिती दिली आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्हा परिषदेचं 2 कोटी, महावितरण 5.5 कोटी, मच्छीमारांचं 1 कोटी तर शेतीचं 2 हजार हेक्टरवर नुकसान झालं आहे. नुकसानीमध्ये सर्वाधिक प्रमाण हे बागायतीचं आहे. 


दरम्यान, बागायतींच्या नुकसान भरपाई पोटी सध्या प्रति हेक्टर 18 हजार रुपये दिले जातात. पण, निसर्ग चक्रीवादळावेळी हा निकष बाजूला सारत 50 हजार प्रति हेक्टर इतकी नुकसान भरपाई दिली होती. त्यामुळे तोक्तेमध्ये देखील निसर्गप्रमाणे अर्थात एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत केली जाणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्र किंवा शेतीच्या नुकसानीचा हा आकडा 12.50 कोटींच्या घरात जातो. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा हा 30 कोटींच्या घरात गेला आहे. 


जिल्ह्याला राज्य सरकारकडून मदत प्राप्त झालेली नसून मृत पावलेल्या दोन व्यक्तींकरता आठ लाखांची मदत तातडीने दिली आहे.  तोक्ते चक्रीवादळाच्या काळात जिल्ह्यात 2 व्यक्ती मृत पावल्या तर 9 जण जखमी झाल्याची नोंद आहे. यावेळी घरांच्या नुकसानीचा आकडा हा पाच कोटींच्या घरात आहे. दोन झोपड्या पूर्णत: पडल्या असून 446 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. यावेळी 60 दुकानं आणि 56 इमारतींचं नुकसान झालं असून 125 इमारतींचं यावेळी नुकसान झालं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यात 1 हजार 239 गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यात 17 घरांचं पूर्णत: नुकसान झालं आहे. 


दरम्यान, सध्या पावसाळा तोंडावर आल्याने सरकारकडून तातडीने मदत मिळणं गरजेचं आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. कोरोनामुळे सारे व्यवहार ठप्प आहेत. अशा वेळी कामधंदा नसल्याने हातात पैसे नाहीत. त्यामुळे उद्ध्वस्त झालेला संसार सावरायचा तरी कसा? असा प्रश्न नुकसानग्रस्त कोकणी माणसाला पडला आहे. त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या मदतीकडे सर्वांचं लक्ष आहे.