Nashik Hanuman Birthplace : काही दिवसांपूर्वी हनुमान जन्मस्थळाचा (Hanuman Birthplace) वाद चांगलाच पेटला होता. आता पुन्हा हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कर्नाटकात (Karnataka) हनुमानाचा जन्म झाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री योगी (Yogi Adityanath) यांनी एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे नाशिकच्या साधू महंतांकडून योगींच्या वक्तव्याचा विरोध करण्यात आला असून योगींचे काम स्तुत्य, मात्र त्यांनी धर्मात राजकारण करू नये, असा सल्ला महंतांकडून देण्यात आला आहे. 


नाशिक (Nashik) शहराजवळील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील अंजनेरी (Anjneri) येथे हनुमानाचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. यावरून काही महिन्यापूर्वी नाशिकमध्ये रणकंदन माजले होते. अनेक धर्मपीठाच्या महंतांनी एकत्र येत धर्मसभा घेतली होती. त्याद्वारे चर्चा करून अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे सांगितले होते. त्यावरून अयोध्येतील आचार्य गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच जन्मस्थळ असल्यावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


सद्यस्थितीत कर्नाटकात निवडणुका (Karnataka Election) सुरु असून या निवडणुकांच्या प्रचारदौऱ्यात योगी आदित्यनाथ पोहचले आहेत. येथील एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाचे जन्मस्थान कर्नाटकात असल्याचे म्हटले आहे. यावरून वादंग पेटले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाचा जन्म कर्नाटकमध्ये झाल्याचे म्हटले. त्याला नाशिकच्या साधूमहंतांनी विरोध केला आहे. कर्नाटकात निवडणूक सुरू असल्याने योगीनीं वक्तव्य केल्याचा महंत सुधीरदास पुजारी यांनी आरोप केला आहे. तर महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी मोदींच्या भाषणाचा संदर्भ देत योगी आदित्यनाथ यांचे कान टोचले आहेत. 


धर्मात राजकारण करू नये.... 


यावेळी महंत सुधीरदास म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकमध्ये भाषणाच्या दरम्यान सांगितलं की मारुतीची जन्मभूमी कर्नाटक आहे. मारुतीची जन्मभूमी अंजनेरी आहे. त्र्यंबकेश्वरच्या बाजूला अंजनेरी असून यावर धर्मशास्त्रीय निर्णय देखील झालेला आहे आणि पाठक गुरुजींनी या संदर्भात जो निर्णय दिला आहे, त्यावरही सर्व संमती झाली असताना पुन्हा अशा पद्धतीचे राजकीय विधान करून लोकांचे दिशाभूल करणे, हे योग्य नाही.  योगींचे काम स्तुत्य, मात्र त्यांनी धर्मात राजकारण करू नये असा सल्ला दिला आहे. 


अंजनेरीचा इतिहास काय? 


अंजनेरी हे तस सध्याच्या घडीला हजार दोन हजार लोकवस्तीचं गाव. परिसरात आजही अनेक प्राचीन काळातील मंदिरे असून हेमाडपंथी मंदिरे देखील पाहायला मिळतात. याच परिसरात जैन तीर्थंकराचे मंदिर, मठ व धर्मशाळा आजही उभ्या आहेत. एका जैन देवालयात 1142 चा संस्कृत शिलालेख असून त्यात यादव राजपुत्र सेउणचंद्र याचा उल्लेख आहे. ब्राह्मणी वास्तुकलेचे नमुनेही येथे भरपूर असून गणपतीची मूर्ती व शिवलिंग आढळते. मुस्लीम सत्तांच्या काळातही अंजनेरीचे उल्लेख येतात.