Maha Vikas Aghadi on Loksabha Election : एका बाजूला विरोधकांची एकी असलेल्या इंडिया आघाडीला एका मागोमाग एक असे धक्के बसत असतानाच महाराष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या महाविकास आघाडीची अखेर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maha Vikas Aghadi on Loksabha Election) गुरुवारी (25 जानेवारी) महत्वपूर्ण बैठक पार पडली. ट्रायडंट हॉटेलमध्ये तब्बल आठ तास झालेल्या या बैठकीत राज्यातील सर्वच म्हणजे 48 लोकसभा मतदारसंघांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चर्चा करण्यात आली.


या बैठकीतील चर्चेच्या केंद्रस्थानी अर्थातच वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा होता. या बैठकीमधूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्र धाडण्यात आले. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या भूमिकेवरून हल्लाबोल करत त्यांची खरडपट्टी केली. महाविकास आघाडीकडून आंबेडकर यांना दिलेलं पत्र सोशल मीडियात आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनीही नाना पटोले यांचा समाचार घेत पत्र सोशल मीडियावरच दिले. 


पुढील बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार 


यानंतर प्रकाश आंबेडकर यांना फोन करून त्यांची मनधरणी करण्यात आली. जयंत पाटील यांनी आंबेडकर यांना फोनाफोनी करत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलणी करून दिली. या बोलणीत काँग्रेसकडून जागावाटपांवर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर या वादावर काहीसा पडदा पडला. त्यामुळे 30 जानेवारी रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील. 


महाविकास आघाडीकडून 48 पैकी 30 जागांवर चर्चा झाल्याचे म्हटलं जात आहे.त्यामुळे उरलेल्या 18 जागांवर चर्चा सुरू असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले होते. वंचितचे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यास त्यांना कोण जागा सोडणार आणि त्याचबरोबर सर्वाधिक चर्चेचा मुद्दा असलेल्या राजू शेट्टी सुद्धा महाविकास आघाडीसोबत आल्यास त्यांना जागा कोण देणार? यावरही खल सुरू आहे. 


ठाकरेंच्या कोट्यातून  वंचित आणि राजू शेट्टींना जागा?


दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीकडून सर्वाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाला येण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्याच कोट्यातून वंचितसाठी 2 आणि स्वाभिमानीसाठी एक जागा सोडली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला सर्वाधिक, त्यानंतर काँग्रेस आणि तीन नंबरवर शरद पवार गट असेल, अशीही चर्चा झाल्याची माहिती आहे.  


सीपीआयकडून दोन जागांवर दावा 


दुसरीकडे, बैठकीसाठी सीपीआयला सुद्धा महाविकास आघाडीकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये सीपीआयकडून दोन जागांवर दावा करण्यात आला आहे. यामध्ये शिर्डी आणि परभणी या दोन जागांचा समावेश आहे.  बैठकीत दोन जागांवर चर्चा केल्याचे सीपीआय नेते सुभाष लांडे यांनी म्हटले आहे. कोणतीही जागा आली तरी आम्ही इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


महाविकास आघाडी जागावाटपावर बाळासाहेब थोरात काय म्हणाले? 


दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज जागावाटपावर भाष्य केले. ते म्हणाले की, 48 जागांचे वाटप आहे. काही जागांवर आम्ही तीन प्रमुख पक्ष किंवा काही जागांवर दोघे दावा करत आहेत. त्यावर  चर्चा झाली आहे. काही जागांवर 30 तारखेला चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. 5 ते 10 जागांवर चर्चा करावी लागणार इतर जगावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. शिवसेना ठाकरे गटातील काही जागांवर काँग्रेसकडून दावा करण्यात आल्याचे समजते. 


इतर महत्वाच्या बातम्या