Loksabha Election 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम उद्या (16 मार्च) जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) ही माहिती देण्यात आल्याने उद्यापासून देशातील वातावरण निवडणूकमय असेल. यासोबत मुदत संपत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा सुद्धा कार्यक्रम घोषित होणार आहे. निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग उद्या 16 मार्च रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे दुपारी ३ वाजल्यापासून होणार आहे. 


काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत. यामध्ये ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. यासोबतच देशभरात आचारसंहिताही लागू होणार आहे. तत्पूर्वी, एक दिवस आधी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू या दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. दोघांनी आज पदभार स्वीकारला. यानंतर आयोगाच्या तिन्ही अधिकाऱ्यांची निवडणूक कार्यक्रमासंदर्भात बैठक झाली.


राजकीय पक्षांनी प्रचारात मुलांचा वापर करू नये


दरम्यान, 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात कोणत्याही स्वरुपात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. पक्षांना पाठवलेल्या ॲडव्हायझरीमध्ये, निवडणूक पॅनेलने पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर आणि पॅम्प्लेट वाटणे आणि घोषणाबाजी करणे याला बंदी असेल. 


2024 च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी मतदार 


2024 च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी लोक मतदान करू शकतील. निवडणूक आयोगाने सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित अहवाल प्रसिद्ध केला असून 18 ते 29 वयोगटातील 2 कोटी नवीन मतदार मतदानात सामील झाले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत 6 टक्के वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे 97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. 


ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करता येईल


निवडणूक आयोगाच्या शिफारशीनंतर सरकारने वृद्ध मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याच्या निवडणूक नियमात बदल केला आहे. आता फक्त 85 वर्षांवरील वृद्ध मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. आतापर्यंत 80 वर्षांवरील लोक या सुविधेसाठी पात्र होते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये निवडणुकीच्या तारखांची घोषणा आणि मतदान यामध्ये सुमारे 40 ते 50 दिवसांचे अंतर होते. 2019 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात पार पडल्या. चौथ्या दिवशी म्हणजे 23 मे रोजी निकाल लागला. त्याचप्रमाणे 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखाही 5 मार्च रोजी जाहीर झाल्या होत्या. 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत 9 टप्प्यात निवडणुका झाल्या. यावेळीही निकाल चौथ्या दिवशी म्हणजे 16 मे रोजी लागला.


दुसरीकडे, 4 राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय दलाचे 3.4 लाखांहून अधिक जवान तैनात केले जातील. सैनिकांची पहिली तुकडी 1 मार्च रोजी देशातील अतिसंवेदनशील भागासाठी रवाना होणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिसंवेदनशील मतदारसंघांमध्ये मतदानपूर्व तैनातीचा भाग म्हणून सुमारे 2,000 कंपन्या तैनात केल्या जातील. ज्यामध्ये सुमारे दीड लाख सैनिक असतील.


इतर महत्वाच्या बातम्या