Lokmanya Tilak Jayanti : आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून मी उभा राहिन असं परखडपणे सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) यांची आज जयंती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नेत्यांमध्ये टिळकांचे नाव अभिमानाने घेतले जाते. भारतात ब्रिटीश सरकारविरोधात वाचा फोडण्यासाठी तेव्हा वैचारिक साधनांची आवश्यक होती. त्यासाठी टिळकांनी पत्रकारितेचा मार्ग निवडला. पुण्यात शिकत असताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं टिळकांनी स्वप्न पाहिलं. ब्रिटीश सरकारविरोधात धुमसत असलेला राग हा त्यांना प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवायचा होता. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन लढण्याचा मानस त्यांनी ठेवला. जर स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं तर मिळालेल्या स्वातंत्र्याची आपल्याला किंमत राहणार नाही असं मत असणाऱ्या टिळकांनी देशासाठी घरदार सोडून सहा वर्ष मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली. त्यामुळे आजही लोकमान्य असणाऱ्या या नेत्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान आहे.
पत्रकारितेच्या केसरी युगाची सुरुवात
त्या काळात लोकांना वैचारिकरित्या सज्ञान करणं आवश्यक होतं. त्यासाठी परखड विचारांची देखील तितकीच गरज होती. लोकमान्य टिळक, आगरकर आणि विष्णु शास्त्री चिपळूण यांनी या वैचारिक प्रसाराची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी 1881 मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरु केलं. स्वदेश, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षा या चार मुख्य विषयांचा समावेश केला होता. तर सामाजिक परिवर्तन करुन जनजागृती करणे आणि ब्रिटीश सरकारच्या जुलमी राजवटीला प्रखर विरोध करणं हा या वृत्तपत्रांचा मूळ हेतू होता.
त्यांच्या अग्रलेखांमुळे त्यांनी अनेकदा तुरुंगवास देखील भोगला. पण ‘ रस्तोरस्ती रात्री दिवे लावलेले असल्याने व पोलिसांची गस्त सारखी फिरत असल्याने जो उपयोग होतो तोच ज्या त्या जागी वर्तमानपत्रकर्त्यांची लेखणी सदोदित चालू असल्याने होत असतो ’ असं केसरीचं धोरण ठरवण्यात आलं त्यानंतर मात्र केसरीच्या वैचारिक आणि ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात झाली. जवळ जवळ 80 वर्षांचा स्वातंत्र्याचा काळ आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये केसरीने आपला वेळ व्यतित केला आहे. स्वातंत्र्यप्राप्ती आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याशिवाय अनेक प्रश्नांना केसरीने वाचा फोडली. या प्रश्नांना ऐरणीवर आणण्याचे महत्त्वाचे काम 'केसरी'ने केले होते. केसरीने त्या काळातील समाजातील जी अराजकता माजत होती ती स्थिरस्थावर करण्यासाठी प्रसार माध्यम म्हणून केसरीने महत्त्वाची भूमिका बजावली.
केसरीचं 1982 च्या अखेरीस संपूर्ण भारतात लौकिक पसरला. तोपर्यंत भारतातील सर्वात जास्त खप असणारे वृत्तपत्र म्हणूनही केसरीची ओळख झाली. कोल्हापूर संस्थांनचे वाण माधवराव बर्वे यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखामुळे टिळक आणि आगरकर यांनी चार महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जेव्हा या वृत्तपत्राची सुरुवात झाली तेव्हा आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. तर टिळक हे मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते. पण त्यानंतर टिळकांनी 3 सप्टेंबर 1891 रोजी केसरी आणि मराठा या दोन्ही वृत्तापत्रांच्या संपादकपदाची धुरा आपल्या हाती घेतली.
'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?'
पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलं होतं आणि कमिशनर रॅन्डने धुमाकूळ घातला होता. तेव्हा केसरीने या संदर्भात लिखाण करुन महत्त्वाची भूमिका बजावली होती. चाफेकर बंधूंनी रॅन्डची गोळ्या झाडून हत्या केली आणि पुण्यात एकच खळबळ माजली. त्यानंतर चाफेकर बंधूना अटक करण्यात आली आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. यावर देखील टिळकांनी केसरीमधून अग्रलेख लिहित सरकारला ठणकावले. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा घणाघाती सवाल त्यांनी केसरीमधून विचारला. त्यानंतर त्यांनी 'राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही' हा अग्रलेख लिहिला आणि टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली.
पण तरीही टिळकांमधला पत्रकार कधीच मागे हटला नाही वा त्याचा अंतही झाला नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच टिळकांनी ‘पुनश्च हरि:ओम!’ म्हणत त्यांच्या स्वराज्याच्या कामाला पुन्हा सुरुवात केली. या अग्रलेखामुळे टिळकांवर पुन्हा राजद्रोहाचा आरोप करत त्यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर मंडालेच्या तुरुंगात असतानाही टिळकांच्या लेखणीला कधीच आराम मिळाला नाही. किंबहुना ती कधीच थांबली नाही. मंडालेच्या तुरुंगात त्यांच्या लेखणीने गीतेची रहस्य उलघडली.
विधवा पुनर्विवाहाचा कायदा करताना त्यांच्या याच विचारामुळे त्यांच्यामध्ये आणि आगरकरांमध्ये वैचारिक मतभेद झाले. जोपर्यंत आपल्या देशातील लोकांवर कायदे लादले जात नाही तोपर्यंत समाजाची सुधारणा होणार नाही आणि त्यासाठी ब्रिटीश सरकारने नियम करावेत असं आगरकरांचं म्हणणं होतं. पण परकियांनी आपल्या देशाच्या धर्म, परंपरांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, जे करायचं ते आपण आपल्या देशात करायचं असं टिळकांचं मत होतं. त्यामुळे या दोन्ही मित्रांमध्ये वैचारिक मतभेदांमुळे दरी निर्माण झाली ती कायमचीच. त्यानंतर आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र काढण्यासाठी केसरी सोडलं.
लोकमान्य टिळक हे जहाल गटातलं एक सोनेरी पान होतं. एक देशसेवक, समाजसुधार, पत्रकार, संपादक अशा सर्व भूमिका यांनी तिखट पण जबाबदारीने पार पडल्या. त्यासाठी संपूर्ण भारत आणि माध्यम क्षेत्र टिळकांचे कायम ऋणी राहतील यामध्ये तीळमात्र शंका नाही.