Lok Sabha Election Phase 2 : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. या पाचही मतदासंघातील एकूण 97 उमेदवार रिंगनाणात होते. तर या साऱ्यांना आता 4 जून म्हणजेच तब्बल 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर दुसरीकडे विदर्भ (Vidharbha) आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर मतदारसंघातील (Lok Sabha 2024 Nagpur) भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्या निवडणुकीच्या धमधुमीतून मुक्त होताच त्यांनी राज्यात आपल्या सभांचा धुरळा लावलाय. आज एकाच दिवसात नितीन गडकरी हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तब्बल चार सभा घेणार आहेत.  

  


एकाच दिवसात तब्बल चार सभांचा धडाका


राज्यात बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदार विकास ठाकरे यांना काँग्रेसच्या वतीने उमेदवारी देण्यात आली असून त्यांची थेट लढत ही भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात होणार आहे. परिणामी, आपल्या विजयाची हमी या दोन्ही नेत्यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी अर्थात 19 एप्रिलला नागपूरसह पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात निवडणुकांची सांगता झाली आहे. त्यामुळे आता पाचही मतदारसंघातील उमेदवारांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. असे असले तरी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक नितीन गडकरी एक दिवसाची विश्रांती घेतल्या नंतर लगेच प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात रविवारच्या एकाच दिवसात तब्बल चार सभा होणार आहेत. यात दोन नांदेड येथे तर दोन वर्धा आणि हिंगोली येथे नितीन गडकारींच्या सभा पार पडणार आहे. 


कुठे-कुठे आहेत सभा? 


नांदेडच्या देगलूर येथील मोंडा मैदानात सकाळी 11.30 च्या सुमारास नितीन गडकरींची पहिली सभा पार पडणार आहे. त्यानंतर नांदेडच्या मुखेड येथील कंधार फाटा येथे दुपारी 1 च्या सुमारास भव्य जणसभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर  हिंगोली लोकसभा मतदारसंघात रामलीला मैदानात गडकारींची तिसरी सभा पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वर्धा लोकसभा मतदारसंघातील सेलू येथे सभा पार पडणार आहे. या चारही सभास्थळी भाजपने जोरदार तयारी केली असून या सभास्थळी नितीन गडकरी नेमकं काय भाष्य करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या