मुंबई : मुंबईत (Mumbai Lok Sabha Election) 20 मे या दिवशी मतदान होतंय आणि मुंबईचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. मुंबईत आज महायुती (Mahayuti) आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. अशामध्ये मुंबईमध्ये एका अपक्ष उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अपक्ष उमेदवार हा भाजीपाला विक्रेता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील प्रशांत घाडगे यांनी आगामी निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना धमकवण्यात आले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विभागप्रमुख दीपक पवार आणि पक्ष सचिव वैभव थोरात यांनी धमकावले, अशी तक्रार प्रशांत घाडगे यांनी केली. त्यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन लाख रुपये घे अन्...
प्रशांत घाडगे आपल्या तक्रारीत म्हणाले की, शिंदे गटाचे विभाप्रमुख प्रशांत घाडगे हे माझे वर्गमित्र आहे. 6 मे रोजी दीपक पवारांचा फोन आला. निवडणुकीसंदर्भात बोलायचे असून आपण भेटू असे ते म्हणाले. फोनवर झालेल्या संभाषणानुसार निवडणुकीसंदर्भात भेटण्यासाठी दोघांची भेट ठरली. दुसऱ्या दिवशी दोघं एकमेकांना भेटले. त्यावेळ स्वरंक्षणासाठी तक्रारदाराने मोबाइलचे रेकॉर्डिंग सुरू ठेवले. यावेळी दीपकने दोन लाख रुपये घे आणि निवडणूक अर्ज मागे घे, असे त्यांना सांगितले.
दीपकने साहेबांबरोबर बोल असे सांगून पक्षाचे सचिव वैभव थोरातला फोन लावून दिला.
व्हायरल केलेली रेकॉर्डिंग डिलीट करण्यासाठी दबाव
थोरात याने तक्रारदार प्रशांत घाडगे यांना आधी दोन लाखांची व नंतर यापेक्षा जास्त अपेक्षा असेल तर रात्री दहा वाजता कार्यालयात यामिनी जाधव यांची भेट करून देतो असे सांगितले. जवळपास अर्धा ते पाऊण तास चालली. मात्र ही सर्व चर्चा प्रशांत घाडगे यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. आपल्या समर्थकांमध्ये गैरसमज पसरू नये यासाठी आपल्या मित्रांना पाठवली. त्यानंतर 8 मे रोजी दीपक पवारने प्रशांत घाडगे यांना फोन करण्यास सुरुवात केली. मात्र फोन न उचलल्याने काही वेळाने दीपक पवार तक्रारदारांच्या घराबाहेर आला. प्रशांत घाडगे यांना घराबाहेर बोलवून व्हायरल केलेली रेकॉर्डिंग डिलीट करण्यास धमकावले, असे तक्रारीत म्हटले आहे.
निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडणार का?
एकामागोमाग उमेदवारांना धमकावले जात आहे. निवडणूक आयोग अस्तित्वात असतानाही मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडणार का, असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे.
हे ही वाचा :
Maharashtra Live Update: मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार