मुंबई: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून मान्सून (Monsoon 2024 Arrival Date) यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मान्सून महाराष्ट्रातदेखील मान्सून वेळेवर दाखल होणार (Maharashtra Monsoon Update) असून साधारणपणे 7 जून रोजी तळकोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यात मान्सून चार दिवस उशीराने म्हणजे 11 जून रोजी दाखल झाला होता. यंदा मात्र 7 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 


गेल्या वर्षी मान्सून 4 जून रोजी दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मात्र मान्सून 4 दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळात दाखल झाला होता. तर राज्यात 11 जून रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं. आता यंदा मान्सून दिलेल्या अंदाजाप्रमाणे दाखल होतो का हे पहावं लागेल. 


राज्यात काही दिवस अवकाळी पाऊस पडणार


विविध मॉडेल्स आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा केरळात मान्सून 31 मे रोजी दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस दिसेल असं सांगण्यात आलं आहे. 


यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज


भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होत असून ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यावेळी देशात चांगल्या पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंदी महासागराच्या पट्ट्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्याचा परिणाम नैऋत्य मान्सूनवर होऊन यावेळी देशात सरासरीपक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असं भारतीय हवामान खात्याने या आधीच सांगितलं आहे. 


राज्यात अवकाळी पावसाची हजेरी


राज्यात गुरूवारी मान्सनूपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असून मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.


कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर पाहायला मिळाला. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्येही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात. तर पंढरपुरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. 


ही बातमी वाचा: