Lok Sabha Election Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाची (Mahayuti Seat Sharing)  चर्चा सुरु आहे. मात्र,  जागा वाटपाची चर्चा होत असतांना मित्र पक्षांना साधं विचारलंही जात नसल्याने मित्र पक्ष नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीत (Mahayuti) तीन मोठे पक्ष असल्याने जागा मिळवण्यात रस्सीखेच सुरु आहे. अशात लोकसभेच्या उमेदवारीत छोट्या मित्र पक्षांना स्थान मिळणं कठीण आहे. त्यामुळे यावरून महायुतीमधील मित्र पक्ष नाराज आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू (Bachchu Kadu), महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलावून दाखवली आहे. 


महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपने दावा केला आहे. अशात लहान मित्रपक्षांना भोपळा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रपक्ष नाराज आहेत. महादेव जानकर यांनी तर आता महायुतीची अपेक्षा सोडून थेट महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरु केली आहे. 


महायुतीच्या मित्र पक्षांची परिस्थिती काय? 



  • केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाला भाजपकडून एकही जागा मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जागा देऊ या आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात आल्याचे समजते.

  • विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतरही शिवसंग्राम हा त्यांचा पक्ष भाजपचा मित्रपक्ष आहे. मात्र, शिवसंग्रामला देखील कोणतेही जागा दिली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. 

  • कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचाही उमेदवारीबाबत देखील कोणतेही हालचाल नाही. त्यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपने विचार केला नसल्याचे सध्याच्या हालचालींवरून जाणवते.

  • सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वातील रयत क्रांती संघटनेचीही काही वेगळी अवस्था नाही. त्यांना देखील लोकसभेत एकही जागा मिळणार नसल्याचे समोर येत आहे.

  • बडनेराचे आमदार रवी राणा यांचा पक्ष युवा स्वाभिमानी हा भाजपसोबत आहे. त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना अमरावतीत भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात न्यायालयाचा निकाल काय येतो त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

  • माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपकडे काही जागांची मागणी केली होती. पण ती अमान्य करण्यात आल्याने आता जानकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Mahadev Jankar : भाजपनं मला धोका दिला, मी सुरवात केल्यास सरकार राहणार नाही; विजय मेळाव्यातून जानकरांचा इशारा