Mahayuti Seat Sharing: अमरावतीचा (Amravati) उमेदवार हा भाजपच्याच (BJP) तिकिटावर निवडणूक लढवेल. तर रामटेक लोकसभेची जागा शिवसेनेला दिली जाणार असल्याचे मोठं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलंय. सोबतच राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटणार असून त्यासाठी आपण स्वत: दिल्लीला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.


आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. असे असताना काही मतदारसंघ वगळता महायुती मध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. यावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये जागावाटपाचा कुठलाही तिढा नसून आमच्यात सकारात्मक चर्चा सुरु आहे. आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटाच्या चर्चेतून हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असंही त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.


आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात हा विषय संपेल


महाविकास आघाडीप्रमाणेच (Maha Viksa Aghadi) महायुतीमध्येही (Mahayuti) जागावाटपाचे गुऱ्हाळ चालूच आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांत अनेक जागांवरून वाद सुरू असल्याचे बोलले जात असताना हा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, जागावाटापाचे चित्र फार स्पष्ट आहे. फक्त त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात हा विषय संपेल, असे एकंदरीत चित्र असल्याचे बावनकुळे म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो विकसित भारताचा संकल्प केला आहे, त्याला जनतेनी साथ दिली पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन हा संकल्प सत्यात उतरविण्याच्या प्रयत्नात आहोत. सध्या आम्ही बुथवर लक्ष केंद्रीत करत आहोत, त्यातून आम्हाला 51 टक्के मते मिळतील अशी अपेक्षा असल्याचेही बावनकुळे म्हणाले. मोदींनी अनेक गरीब कल्याणाच्या योजना आणल्या आहेत. काँग्रेसचे 65 वर्षे आणि मोदींची 10 वर्षे याचा विचार केला तर मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात जास्त कामे झाल्याचेही बावनकुळे म्हणाले. 


हा विषय कुणाच्या व्यक्तिगत प्रतिष्ठेचा नाही 


अमरावतीची जागा निश्चित भाजपकडे असून या मतदारसंघात लवकरच भाजपचा उमेदवार जाहीर होईल. याकरिता महायुतीतील सर्व नेते आम्ही एकत्रित बसून याबाबत चर्चा करणार आहोत. आगामी निवडणुकांमध्ये आमचा जिंकण्याचा निर्धार आहे. त्यामुळे जी जागा जो जिंकेल त्यालाच उमेदवारी देण्याचे आमचे प्राधान्य असणार आहे. हा विषय कुणाच्या व्यक्तिगत प्रतिष्ठेचा नसून निवडणूक जिंकणे हे महत्त्वाचे असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्यातील प्रमुख नेते आणि केंद्रीय नेतृत्व यांच्या समन्वयाने हा प्रश्न सुटणार आहे. किंबहुना हा तिढा नसून आम्ही ठरवलं तर पाच मिनिटात यावर निर्णय होऊ शकतो अशी ही प्रक्रिया आहे. लवकरच यातील उमेदवारांची नावे स्पष्ट होईल असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


रामटेकबाबत बावनकुळे स्पष्टचं बोलले


रामटेक लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिकरित्या शिवसेनेचा गड राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेचाच उमेदवार असणार आहे.  लवकर या जागेवर उमेदवाराची घोषणा होणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या