ABP Majha Opinion Poll : आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections 2024) आचारसंहिता अवघ्या काही तासातच लागू होणार आहे. सर्वच पक्षांकडून लोकसभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि सी व्होटर यांच्या निवडणूक पूर्व ओपिनियन पोलचा निकाल आज (दि. 15) समोर झाला आहे. 


एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 28 जागांवर महायुतीचे (Mahayuti) उमेदवार विजयी होताना दिसून येत आहे. तर एकूण 20 जागांवर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) विजय होईल. महाविकास आघाडीत काँग्रेसचे 4 खासदार विजयी होतील. 2019 साली काँग्रेस पक्षाचा फक्त एक खासदार निवडून आला होता. तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे मिळून एकूण 16 खासदार विजयी होतील. याचा अर्थ महाविकास आघाडीच्या खासदारांचा एकूण आकडा 20 वर जाईल, असा निष्कर्ष या ओपिनियन पोलमधून पुढे आला आहे. 


शिंदे गट-अजित पवार गटाला किती जागा? 


तर दुसरीकडे महायुतीमध्ये असणाऱ्या भाजपला 22 जागांवर विजय मिळेल.  गेल्या निवडणुकीत भाजपला 23 जागांवर विजय मिळाला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 22 जागांवरच विजय मिळू शकतो, याचा अर्थ भाजपचा एक खासदार कमी होईल. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळून केवळ 6 जागा जिंकता येणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शिंदे गट आणि अजितदादा गटाला सोबत घेतल्यानंतही भाजपची एक जागा कमी होणे, हे धक्कादायक मानले जात आहे. 


उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूती? 


शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. पुढे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाकडे आले. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह देण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिले. शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले. यामुळे जनतेकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना निवडणुकीत सहानुभूती मिळेल,  अशी चर्चा सातत्याने सुरु होती. ओपिनियन पोलनुसार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत सहानुभूती मिळेल, असे दिसून येत आहे. 


अजित पवार गट - शिंदे गटाला फटका बसणार?


तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी सभांचा धडाका लावला होता. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांना कामालीची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला सहानुभूती मिळणार आहे. 2019 सालच्या तुलनेत भाजपची केवळ एक जागा कमी होत आहे. मात्र अजित पवार गट आणि शिंदे गटाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळणार?


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 42.7 टक्के मते मिळतील. 2019 मध्ये एनडीएला एकूण 50.88 टक्के मिळाली होती. ही भाजप आणि शिवसेनेला मिळालेली मते होती. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत एनडीएच्या मतांच्या टक्केवारीत तब्बल 8 टक्क्यांनी घट होईल. 2019 मध्ये यूपीए आघाडीला 32.24 टक्के मते मिळाली होती. आता शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या समावेशानंतर तयार झालेल्या इंडिया आघाडीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 42.1 टक्के मते मिळण्याचा अंदाज एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलनुसार आहे.  इतर पक्षांना यंदाच्या निवडणुकीत 15.1 टक्के मते मिळू शकतात. 


आणखी वाचा


ABP Majha Opinion Poll: लोकसभेला महाराष्ट्रात मविआ आणि महायुतीला किती जागा मिळणार? ओपिनियन पोलचा धक्कादायक निकाल