Nagpur News नागपूर : दोन कोटीची रक्कम गुंतवल्यावर एक कंपनी 3. 20 कोटी रुपयांचा परतावा करेल, अशी बतावणी करत नागपूरातील (Nagpur Newsनऊ जणांनी मिळून वर्धा येथील धान्य व्यापाऱ्याची तब्बल दोन कोटी रुपयांनी फसवणूक (Nagpur Crime)केली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अखेर वर्षभरानंतर अटक करण्यात आली आहे. या फसवणूक करणाऱ्यांमध्ये पोलिसांनी नऊ जणांविरोधातदेखील गुन्हा नोंदविला होता. त्यात कुख्यात आसीफ रंगूनवालाचा देखील समावेश होता. मात्र तेव्हापासून यातील मुख्यसूत्रधार फरार होता. अखेर नागपूर पोलिसांनी  (Nagpur Police) त्याला अटक करत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


नेमके प्रकरण काय ? 


जयेश हरीभाई चंदाराणा (49, हिंगणघाट, वर्धा) असे पीडित धान्य व्यापाऱ्याचे नाव आहे. चंदाराणा आणि त्यांचे मित्र शील देव यांना नागपूरातील हितेश रेवतकर, जयंत वानखेडे, अविनाश भोरेकर यांनी संपर्क केला आणि एका कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगण्यात आले. त्यासाठी अनेक खोटी आश्वासन आणि अधिक पैशाचे आमिष चंदाराणा आणि शील देव यांना दाखवण्यात आले. त्यावरून चंदाराणा आणि देव यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास दाखवला आणि प्रत्येकी एक कोटी रुपये गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली. त्यानंतर तिघांनी सांगितल्याप्रमाणे चंदाराणा यांनी 8 मार्चला दोन कोटी रोख हे नागपूरातील भालदारपुरा येथील आसीफ रंगूनवाला याच्या मालकीच्या रंगूनवाला बिल्डिंगमधील भगत अँड कंपनी येथे आणून जमा केले. ही बनावट कंपनी सत्येंद्र शुक्ला याने थाटली असून त्यातील मेहूल मार्डिया ऊर्फ गणपत याने ते पैसे आपल्या कडे घेऊन पैसे गोडावूनला जमा करतो, तुम्ही आता निघा, असे सांगितले. 


 नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 


त्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर देखील कंपनीकडून बँक खात्यात पैसे जमा करण्याबाबत कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे चंदाराणा आणि देव यांनी रेवतकर, वानखेडे, भोरेकरला संपर्क करत या बाबत विचारणा केली असता लवकरच पैसे जमा होतील, असे सांगण्यात आले. मात्र तरीदेखील पैसे जमा न झाल्याने चंदाराणा आणि देव यांनी पैश्याबाबत तगादा लावला असता त्यांना उडवाउडावीचे उत्तरे देण्यात आली. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चंदाराणा यांनी तत्काळ गणेशपेठ पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासचे चक्र गतिमान करत आसीफ रंगूनवाला, सत्येंद्र शुक्ला, अविनाश भोरेकर, हितेश रेवतकर, जयंत वानखेडे, मेहूल मार्डिया ऊर्फ गणपत, कैलास ऊर्फ विलास नरवाडे, अजय अग्रवाल ऊर्फ सुलतान ताहाखान, विवेक अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर यातील तिघांना अटक करत त्यांच्या कडून 80 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. 


सात दिवसांची पोलीस कोठडी 


हे प्रकरण उघडकीस आल्यापासून यातील मुख्य संशयित आरोपी असेलाला मो. ताहा खान वल्द जलील अहमद खान ऊर्फ सुलतान (क्रॉफर्ड मार्केट, मुंबई) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र त्याने वेगवेगळ्या ठिकाणी पळ काढला होता. दरम्यान, त्याने जामिनाकरिता उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तेथे देखील त्याला दिलासा मिळाला नाही. अखेर त्याने न्यायालयात शरणागती पत्करली असता नागपूर पोलिसांनी त्याला प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले. सध्या त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या