ठाणे : गेले दोन दिवस चर्चा आणि बैठका झाल्यानंतर आज अखेर ठाणे शहरात पूर्णतः लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्याचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे 2 जुलैला सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जुलैच्या सकाळी सात वाजेपर्यंत ठाणे शहरात लॉकडाऊन असेल. त्यामुळे या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कोणालाही शहरात फिरण्यास परवानगी नाही.
ठाणे शहरात मागील काही दिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे covid-19 ची साखळी तोडण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक होते. म्हणूनच पालक मंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त विपिन शर्मा, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी एकत्रितपणे ठाण्यात लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याच वेळी राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन करत असल्याचे जाहीर केले. त्यासोबत मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक गोष्टींना परवानगी देखील देण्यात आली. त्यामुळे काल दिवसभर लॉकडाऊनचा आदेश ठाणे महानगरपालिकेने काढला नाही. राज्य शासनाच्या सर्व नियमांशी सुसंगत राहून आज नवा आदेश पालिका आयुक्तांनी जारी केला. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय सेवा देणारे नागरिक यांनाच घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. इतर सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारे परवानगी नसेल. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
या आदेशामध्ये मद्य विक्रीला देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र केवळ ऑनलाइन आणि होम डिलिव्हरी द्वारे दारू विकता येणार आहे. याच प्रमाणे ज्या जोडप्यांनी आधीच लग्नासाठी नोंदणी केली आहे केवळ त्यांनाच लग्न कार्य करण्याची मुभा असेल. त्यातही राज्य सरकारच्या नियमांनुसार केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत हे लग्नकार्य पार पाडता येईल. रिक्षा टॅक्सी आणि इतर खाजगी प्रवासी वाहतूक सेवा यांना परवानगी नसेल. शहरातील अंतर्गत बस सेवा देखील बंद असेल. कारखाने, कार्यालय, गोदामे आणि इतर खासगी आस्थापना यादेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आदेशातील महत्त्वाचे मुद्दे
- नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही
- अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी
- होम डिलिव्हरीद्वारे मद्य विक्रीला परवानगी
- केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थित लग्नकार्याला परवानगी
- इंटरसिटी एमएसआरटीसी मेट्रो आणि सर्व सार्वजनिक परिवहन सेवा यांना परवानगी नाही
- रिक्षा-टॅक्सी यांना परवानगी नाही
- आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील प्रवाशांना वाहतुकीस परवानगी. त्यातही चालकासह केवळ एका व्यक्तीला खाजगी वाहनात परवानगी
- आंतरराज्यीय बस, प्रवासी वाहतूक सेवा, खाजगी ऑपरेटर त्यांचे कामकाज बंद राहील
- सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी केवळ पाच व्यक्तींनाच परवानगी
- व्यवसायिक आस्थापना, कार्यालय, कारखाने, कार्यशाळा, गोदाम यांच्यासह सह सर्व दुकाने बंद राहतील
- औषध आणि सतत प्रक्रिया करावी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि नाशवंत वस्तू यांच्या प्रक्रिया करणाऱ्या युनिटला परवानगी
- सरकारी कार्यालय कमीतकमी कर्मचाऱ्यांसह सुरू ठेवण्यास परवानगी. त्यातही एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक
- विविध प्राधिकरणा द्वारे पूर्वी जारी केलेले सर्व आदेश अंमलबजावणी संस्था या आदेशात सह अधिक्रमित केल्या जातील
- ज्या व्यक्ती किंवा संस्था या नियमांचे आणि तरतुदीचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महामारी रोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल
या ऑर्डर मधून खालील आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या दुकानांना आणि आस्थापनांना वगळण्यात आले आहे
- बँका, एटीएम, विमा आणि संबंधित बाबी
- प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम
- आयटी आणि आयटीईएस, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, आणि डेटा सेवा
- पुरवठासाखळी आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि उपलब्धता
- कृषी वस्तू आणि उत्पादन आणि सर्व वस्तूंची निर्यात आणि आयात
- अन्न, औषध आणि वैद्यकीय उपकरणे त्यासोबत आवश्यक वस्तूंचे इ फॉर्म वितरण
- पाळीव प्राण्यांसाठी बेकरी आणि पशुवैद्यकीय आस्थापने
- रुग्णालय, मेडिकल दुकाने, ऑप्टिकल्स दुकाने औषधांच्य कंपन्या यांचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक
- पेट्रोल पंप, एलपीजी, गॅस, तेल एजन्सी, त्यांची गोदामे आणि संबंधित वाहतूक कामे, केवळ अत्यावश्यक सेवेतील पास धारकांसाठी
सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा - Covid-19 च्या नियंत्रणासाठी सहाय्य करणाऱ्या सेवा