पंढरपूर : बँकेत खातेच नसताना शेतकऱ्यांना थेट कर्जाच्या नोटिसा आल्याचा प्रकार पंढरपूरमध्ये घडला आहे. लाखो रुपयांच्या कर्जाच्या नोटिसा आल्याने पंढरपूरमधील शेतकरीही चक्रावून गेले आहेत.


पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील चांगदेव भोसले आणि त्यांच्या दोन मुलांना सोलापूर येथील कॅनरा बँकेतून थेट लाखो रुपयाच्या कर्जाच्या नोटिसा आल्या आहेत.

पंढरपुरात देखील कोणत्याच बँकेत खाते नसताना थेट सोलापूर येथील बँकेतून कर्जाच्या नोटिसा कशा आल्या याचा विचार सध्या भोसले कुटुंबीय करत आहे. कर्जाच्या नोटिसा मिळताच भोसले कुटुंबीयांनी तात्काळ पंढरपूर येथील कॅनरा बँकेत धाव घेतली. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी सोलापूर शाखेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

भोसले कुटुंबातील वडिलांना २ लाख २१ हजार, मुलगा हनुमंत यास ३ लाख ३० हजार आणि दुसरा मुलगा मारुती याच्या नावावर ३ लाख ३१ हजार रुपयाच्या कर्जाच्या नोटिसा आल्या आहेत.

हे कर्ज २०१५ सालातील असून आपल्या नावावर कोणी खोटे कर्ज काढण्यात आल्याचा दावा भोसले कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी  चांगदेव भोसले यांनी केली आहे.