पुणे : मराठा आरक्षणानंतर आता इतर समाजही आरक्षणासाठी हळूहळू आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे लिंगायत समाजाला आरक्षण द्या नाहीतर 26 जानेवारी 2019 पासून अन्नत्याग आंदोलन करु, असा इशारा लिंगायत समाजाने राज्य सरकारला दिला आहे. पुण्यात मंगळवारी लिंगायत समितीतर्फे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समितीने आरक्षणाची मागणी मांडली.


लिंगायत समाजाला संविधानिक आणि अल्पसंख्यांकाचा दर्जा द्यावा, तसेच लिंगायत समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे अशा मागण्या समाजाने सभेत मांडल्या.

तसेच 31 डिसेंबरपर्यंत आरक्षणाच्या प्रश्नाबाबात जर सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर 26 जानेवारीनंतर अन्नत्याग करण्याचा इशाराही लिंगायत संघर्ष समितीतर्फे देण्यात आला.

आरक्षणासाठी एकिकडे धनगर समाज आक्रमक झालेला आहे. त्यात आता लिंगायत समाजानेही त्यांची आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.