Maharashtra Politics:  राज्यातील सत्ता संघर्षाच्या खटल्याचा निकाल येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. या खटल्यात नेमकं काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मागील काही दिवसास पडद्यामागून आणि पडद्यासमोर सुरू असलेल्या राजकीय चर्चांमुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमुळे भाजपचे दिल्लीतील नेते काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे. 


महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच भूकंप होणार आहे का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा बदलले जाणार आहेत का? शिंदेंना हटवून अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होणार का? याची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena Uddhav Thackeray Faction) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना या दैनिकातील रोखठोक सदरात पक्ष फोडीचा दुसरा सीझन सुरू होणार असल्याचे म्हटले होते. भाजपच्या निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असल्याचे म्हटले होते. राऊत यांनी या सदरात अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले होते. तर, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणात दोन स्फोट होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. 


काही दिवसांपूर्वी राज्यातील शिवसेना-शिंदे गट आणि भाजपचे सरकार जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे सरकार येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या सरकारमध्ये अजित पवार हे मुख्यमंत्री येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर, काही दिवसांनी सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या खुल्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदासाठी आपण आजही तयार असल्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. 


विखे पाटील यांच्या नावाचीही चर्चा


राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करूनही मराठा समाज अद्यापही भाजपकडे वळला नसल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शिंदे यांच्याऐवजी आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. विखे पाटील हे मराठा चेहरा असले तरी सहकार क्षेत्रावर असलेली त्यांची पकड हे मुख्य कारण विखे पाटील यांच्यासाठी ठरू शकते, अशी चर्चा सुरू आहे. भाजपने सहकार क्षेत्रात प्रवेश मिळवला असली तरी पूर्णपणे पकड मिळवता आली नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच विखे-पाटील यांची वर्णी लागल्यास दोन्ही बाबी साध्य करता येऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.