करमाळा : करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी ऊस बिल संदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे याना शेतकऱ्यांसमोर मारहाणीचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं सांगितलं आहे. दिग्विजय बागल हे राष्ट्रवादीच्या माजी आमदार शामलताई बागल यांचे सुपुत्र असून सध्या बागल हे शिवसेनेत आहेत.


 शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल हिप्परगे यांनी या प्रकारानंतर म्हटलं आहे की, जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाध्यक्ष विजय रणदिवे व करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते गेल्या वर्षीचे ऊसबिले पूर्ण न देता यावर्षी कारखाना सुरु कसे केले, बिले केव्हा देणार? असे विचारायला गेले होते. त्यावेळी गुंड घेऊन चेअरमन दिग्विजय बागल यांनी रणदिवे व कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करुन मारहाणीचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांच्या ऊसबिलापोटी संघटनेच्या शिलेदारांना मारहाण करणार्‍या दिग्विजय बागलांना संघटना येत्या काळात सडेतोड उत्तर देईल. शेतकऱ्यांच्या जीवावर जगणारे तथा भाडोत्री गुंडांच्या जीवावर उड्या मारणाऱ्या दिग्विजय बागलांना येत्या काळात शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, अमोल हिप्परगे यांनी म्हटलं आहे.



 


स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी म्हटलं आहे की, आमच्या पदाधिकाऱ्यांना स्वतः व गुंडांकरवी जी मारहाण केली आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. विशेष म्हणजे हे चेअरमन शिवसेनेचे नेते आहे.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आपले कार्यकर्ते वेळीच आवरा.. सत्तेची ही मस्ती नक्कीच उतरवली जाईल. राज्यभरातील स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्यांसह आम्ही दिग्विजय बागल यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.


महत्वाच्या बातम्या


MHADA Exam: म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली, मंत्री जितेंद्र आव्हाडांचं मध्यरात्री ट्वीट, विद्यार्थ्यांचा संताप


PM Modi : पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा