अहमदनगर : उन्हाळा आला की, लिंबाचे भाव हे गगनाला भिडतात. यंदा तर लिंबाने मागील सर्व विक्रम मोडीत काढत शंभरी पार केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना 100 ते 120 रुपये किलोप्रमाणे दर मिळत असून तेच लिंबू किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी 200 ते 220 रुपये किलो प्रमाणे मिळत आहे.
नगर जिल्ह्यात कर्जत, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंबाचे उत्पादन घेतले जाते. या लिंबाचे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर लिलाव होतात. बाजार समितीत आणि जागेवर शेतकऱ्यांना यंदा 100 ते 120 रुपये भाव मिळत आहे. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे लिंबाचे उत्पादनच कमी असल्याने भाव मिळूनही शेतकऱ्यांचा फारसा फायदा होणार नसल्याचे अहमदनगरच्या तांदळी वडगाव येथील शेतकरी रमेश ठोंबरे यांनी म्हटले आहे. त्यातच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर लिंबू महाराष्ट्राच्या बाजारात येत असल्याने महाराष्ट्रातील चांगल्या दर्जाच्या लिंबाला देखील भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी लिंब बाजारात आणत नाहीत त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने किरकोळ बाजारात लिंबाचे दर वाढतात असं ठोंबरे यांनी म्हटले आहे.
सोबतच या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना न होता तो व्यापाऱ्यांना जास्त होतो, त्यामुळे ग्राहकांनाही कमी दरात लिंबू मिळावे अशी अपेक्षा ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने इतर राज्यातून महाराष्ट्रात लिंबू येते तसेच नगर जिल्ह्यातून जयपूर, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू या भागात लिंबांना मागणी असते. यंदाही ती वाढली आहे. मार्च महिन्यात भाववाढीला सुरवात होते. फेब्रुवारीच्या अखेरीस 25 ते 30 रुपये किलो असलेला भाव आता वाढून शंभरी पार गेला आहे. यंदा खराब हवामानामुळे मधल्या काळात बहर आणि फळांची झड झाली. त्यामुळे उत्पादन घटले. त्या तुलनेत खर्च मात्र होत राहिला. त्यामुळे भाव वाढले असले तरी तेवढे उत्पादन तुलनेत वाढलेले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त उत्पादन आहे, अशा मोजक्याच शेतकऱ्यांचा या भाव वाढीचा फायदा होऊ शकतो, इतरांना याचा फारसा फायदा होत नसल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे.