Agriculture News : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav)  काळात बाजारात मोठ्या प्रमाणात कृत्रिम फुले (Artificial flowers) विक्रीसाठी येतात. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane)  यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पत्र लिहलं आहे. भरणे यांनी कृत्रिम फुलांच्या वापरास कायदेशीर प्रतिबंध घालण्याची मागणी पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. 

Continues below advertisement


कृत्रिम फुलांच्या वापरामुळं फुल शेती धोक्यात


कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहीत कृत्रिम फुलांच्या विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. कृत्रिम फुलांच्या वापरामुळं फुल शेती धोक्यात आली आहे. यामुळं  शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी हितास्तव पर्यावरण विभागाकडून कायदेशीर उपाययोजना करण्याची विनंती दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना केली आहे. अशात, सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे. 




शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम


शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर प्लास्टिक फुलांमुळे गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळं कृत्रिम फुलांवर तात्काळ बंदी घालावी असी मागणीकेली जात आहे. कृत्रिम फुलांचा वापर आल्यानं फूलशेती संकटात आल्यास त्याचा थेट परिणाम मध उत्पादनावरही होईल असं कारण अधोरेखित करत प्लास्टीक फुलांवर तातडीने बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. आधीच फुलशेतीवर विविध कारणामुळं परिणाम होत आहे. त्यातच पुन्हा कृत्रिम फुले बाजारात आल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. विविध संकटांमुळं फुल शेतीच क्षेत्र झपाट्याने कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही फुलशेती फक्त शेतकरीच नव्हे तर मजूर, वाहतूकदार, फूल व्यावसायिक, फूल अडते, फूल सजावट कारागीर यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करते व त्यांचे अर्थकारण संपूर्ण याच फूल शेतीवर अवलंबून आहे.


फूल शेतीमुळे फक्त फूल शेतीच नव्हे, तर या फुलांवर बसणाऱ्या मधमाशांमुळे सर्वच प्रकारची शेती चांगल्या प्रकारे पिकवली जाते. फूल शेती पूर्ण बंद झाल्यास मधमाश्यांचा देखील गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच या कृत्रिम फुलांमध्ये वापरण्यात येणारे रंग मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे संशोधनामध्ये आढळले असल्याचे नमूद केले आहे.


महत्वाच्या बातम्या:


महाराष्ट्रात प्लॅस्टिक फुलांवर बंदी येणार, 105 आमदारांच्या सह्यांचे पत्र; मुख्यमंत्र्यांची संमती, लवकरच निर्णय