सांगली : येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला समर्थन करणारे 50 टक्के आमदार विधानसभेत पाठवणार या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या घोषणेचं स्वागत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलं आहे. ओबीसी आरक्षणावर कोणताही शब्द न उच्चारणाऱ्या ओबीसी आमदारांना जर जरांगे पाडणार असतील तर त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचंही ते म्हणाले. लक्ष्मण हाके सांगलीमध्ये बोलत होते.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, येत्या निवडणुकीत जर मराठा समाजाचे 50 टक्के आमदार मनोज जरांगे पाठवणार असतील तर त्याचं स्वागत आहे. पण त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मराठा समाजाचे आमदार विधानसभेत आहेत.
ओबीसींच्या हक्कांवर न बोलणारे पराभूत झाले पाहिजेत
लक्ष्मण हाके म्हणाले की,ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने या महाराष्ट्रातील कुठलाही आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाहीत. मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजे असं आमचंही मत आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मागणीच्या पाठिंब्याबाबत जर लोकप्रतिनिधीनीनी निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाजपण लोकप्रतिनिधीच्या बाबत निर्णय घेतील अशी भूमिका मराठवाड्यातील बैठकीत घेण्यात आल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रामध्येही लवकरच निर्णय घेऊ असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय.
जरांगे निवडणूक लढवणार नाहीत
या आधी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढली होती. त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, मनोज जरांगे यांची लढाई आरक्षणाची नसून वर्चस्वाची आहे. जरांगे पाटील हे निवडणूक लढू शकत नाहीत, हे माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या. ज्या मागण्या मान्य होणार नाहीत, अशा मागण्या घेऊन ते आंदोलन करत आहेत हे त्यांना आणि त्यांना सल्ला देणाऱ्यांना दोघांनाही माहीत आहे.
महापुरुषांच्या प्रतिमेसमोर बसून शिवराळ भाषा वापरणारा हा माणूस तारीख पे तारीख देऊ शकतो, याशिवाय जरांगे दुसरे काही करू शकत नाहीत. निवडणुकीमध्ये कोणाविरुद्ध प्रचार करतात हेही सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करेल पण निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विचार नाही आणि मॉडेल देखील नसल्याचे हाके यांनी म्हटले.
ही बातमी वाचा :