यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून सुरेखा पुणेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र याबाबत पुढे काय झालं, आपल्याला माहिती नाही. आपल्याला कुणाचा फोनही आला नाही, अशी खंत पुणेकर यांनी व्यक्त केली. लावणी आणि तमाशा कलावंतांचे अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी एकतरी प्रतिनिधी लोकसभेत जाणं गरजेचं आहे. त्यामुळं मला संधी मिळाल्यास माझी कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचंही त्या म्हणाल्या. तसंच आता लोकसभा नाही, तर किमान विधानसभा निवडणुकीत तरी एखाद्या पक्षानं आपल्या नावाचा विचार करावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात लोककलेचा प्रसार केला. हजारो लोककलावंत आज महाराष्ट्रात तळागाळात आहे. आम्ही लोकांचं मनोरंजन करतो. आज तमाशा कलावंत आणि लावणी कलावंतांचे हाल आहेत, आमचा प्रश्न एखादा आमदार किंवा खासदार का उचलत नाही. त्यामुळे आमच्यातूनच एखादा प्रतिनिधी पुढे येणे गरजेचे आहे, त्यामुळे मला निवडणूक लढवायची आहे, असे पुणेकर यावेळी म्हणाल्या.
माझ्यावर महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात गेलं तरी प्रेम करणारे प्रेक्षक आहेत, कलावंत आहेत. मी लोकांची सेवा करायला तयार आहे. कुठल्याही पक्षातून मला तिकीट द्यावं मी निवडणूक लढवेन, असेही त्या म्हणाल्या.
सुरेखा पुणेकर पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. याबद्दल स्वतः सुरेखा पुणेकर यांनी संकेत दिले होते. पुण्यातून भाजपाने गिरीश बापट यांच्या विरोधात सुरेखा पुणेकर यांच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर आली होती. सुरेखा पुणेकर यांनी मी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांशी बोलले, ते मला त्यांचा निर्णय कळवणार आहेत. मात्र दिल्लीत मी कुणाला भेटले त्यांची नावं सांगणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र नंतर त्यांची वर्णी लागू शकली नाही. पुण्यातून शेवटच्या क्षणी मोहन जोशींना उमेदवारी घोषित करण्यात आली.
WATCH VIDEO | माझा कट्टा : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्याशी दिलखुलास गप्पा