फोटोग्राफर इस्माईल शेख यांनी मिनी डिव्ही कॅमेऱ्यात टिपलेली ही 30 सप्टेंबर 1993 ची सकाळी सात वाजून पाच मिनिटांची दृष्य. 3 वाजून 55 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा अंदाज येताच इस्माईल उमरग्याहून ट्रकमध्ये बसले. वाटेत दिसतील तशी दृष्य टिपत-टिपत योगायोगाने भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या एकोंडीत पोहोचले. गावात एकही घर शिल्लक राहिलं नव्हतं. बचावलेला प्रत्येकजण घरांच्या ढिगाऱ्यात, आप्तस्वकियांचा शोधात होता.
उमरग्याहून निघताना पिटीसाठी बाहेर पडेलेली बीपीएडच्या विद्यार्थ्यांची टीम इस्माईल यांनी सोबत घेतली. या भागात पोहोचलेली ही पहिली रेस्क्यू टीम... समोरची दृष्य बघून टीममध्यल्या विद्यार्थ्यांना कामं नेमकं कुठून सुरु करायचं असा प्रश्न पडला.. प्रत्येक ढिगाऱ्याखाली दोन-तीन जण दबलेले होते.
इस्माईल यांनी आपल्याच कॅमेऱ्यात कैद केलेली दृष्य आठवून 25 वर्षांनंतरही त्यांना शांत झोप लागत नाही. इस्माईल किल्लारीत पोहोचले तोपर्यंत 6.4 रिस्टर स्केलचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतरच्या तीन छोट्या धक्क्यांनी किती नुकनान झालंय याचा इस्माईल यांना अंदाज आला नव्हता. हादरलेल्या जमिनीने लोकांना सावरण्याची संधीच दिली नव्हती.
हजारो मृत्यूमुखी, चार दिवसांनी कळलं
इस्माईलचे मेहुणेही शाळेच्या प्रांगणात गतप्राण झाले. पण इस्माईल भाईंना हे तीन दिवसानंतर कळलं. चार दिवसानंतर जगाला कळलं, दोन जिल्ह्यातली मिळून 30 गाव पूर्ण भूईसपाट झाली होती. 30 हजार घराखाली दबून 7 हजार 928 लोक मेले. 16 हजार जखमी झाले. 15 हजार 854 जनावरांनी प्राण गमावले.
एकोंडीत भाऊराव जाधवांनी मुलगी...प्रविणने वडिल आणि बाबासाहेबाने आई वडील गमावले. फतिमा पटेलची दोन मुलं आणि एक मुलगी भूकंपात गेली.
किल्लारीची एक मुलगी जन्मभरासाठी लुळी-पांगळी झाली. दिव्यांग असल्यामुळे लग्न नाही झालं या मुलीचं..
एकाच कुटुंबातील 12 जण गेले
लिंबाळा गावच्या नंदकुमार कुलकर्णींच्या घरातली छोटी-मोठी मिळून 12 सदस्य या भूकंपात गेले. या 12 जणांच्या आठवणी जाग्या रहाव्यात यासाठी ग्रामस्थांनी गावाच्या जुन्या जमिनीवर रोपवन तयार केलंय. रोपवनात वेगवेगळ्या प्रकारची अनेक झाडं आहेत. नंदकुमार आपल्या नातलगांची आठवण जागवीत 25 वर्षांनंतरही रोपवनात येऊन बसतात. सोबतीला जुन्या घरांच्या दगडांची संगत असते..
1 ऑक्टोबरला किल्लारी गावात हे असं दृष्य होतं. बँका.. दुकान..घरं सगळं जमीनदोस्त झालं होतं. जखमींना जमेल त्या वाहनातून दवाखान्यात पोहोचवण्याची घाई होती. रुग्णालयात रुग्ण... आणि प्रेतं शेजारी-शेजारी होती.. मयतांवर सामूहिक अत्यसंस्काराची तयारी सुरु होती.. ही महाराष्ट्रातलीच नाही तर जगावर आलेली सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती होती...
भूकंपातून वाचलेली मिरॅकल बेबी
प्रिया जवळगेला मिरॅकल बेबी म्हणतात... भूकंपाच्या वेळी दीड वर्षांची प्रिया... पाच दिवस घराच्या ढिगाऱ्खाली होती. आई-वडिलांनी प्रिया जिवंत असल्याची आशा सोडली होती. बचावाचं काम करणाऱ्या सैनिकी अधिकारी आणि बचाव पथकातल्या एका श्वानामुळे प्रियाचे प्राण वाचले.. श्वानाने शोधल्यानंतर प्रियाला सात फूट खोदून बाहेर काढलं गेलं. ती पलंगाच्या खाली होती.
प्रिया भल्या पहाटे सापडली म्हणून डॉ. जयश्री चौगुलेंनी भूकंप पीडितांसाठी सुरु केलेल्या हॉस्पिटलला नाव दिलं... गुड मार्निंग प्रिया हॉस्पिटल...
मूळच्या नागपूरच्या जयश्री चौगुले भूकंपग्रस्तांची सेवा करण्यासाठी दाबेगावला आल्या.. इथल्याच झाल्या... हॉस्पिटलबरोबरच भूकंपग्रस्त मुलांसाठी डॉक्टरांनी खेडेगावात इंग्रजी शाळा सुरु केलीय. याच शाळेत डीएड झालेली प्रिया आज मुलांना शिकवते.
या प्रलयकारी भूकंपात एका 10 वर्षाच्या चिमुकल्याने राष्ट्राला शौर्य दाखवलं. त्यावेळचा चिमुकला आज 30 वर्षांचा ग्रामसेवक तरुण आहे.. गणपतीसाठी आजोळी गेलेल्या शिवशंकरने आजी-आजोबांना बोटाला धरुन भूकंपाच्या वेळी घराबाहेर काढलं. त्यामुळे शिवशंकरला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. शिवशंकरच्या धाडसाचा पाठ पंधरा वर्षे बालभारतीमध्ये होता.
शरद पवार यांची तत्परता
भूकंपाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी केलेल्या कामाला तोड नाही. पवार सर्वात आधी भूकंपग्रस्त भागात पोहोचले. त्यामुळे मदतकार्याला वेग आला. पवार लोकात बसले.. प्रत्येक गावात जाऊन लोकांशी बोलले.
जगभरातून मदत येत होती. मदतीच्या गाड्यामुळे जागोजागी ट्राफिक जाम होत होतं. दगड मातीच्या बांधकामामुळे मोठी जीवितहानी झाल्याचं स्पष्ट झालं.. सैनिकांनी आधी तात्पुरते पत्र्यांचे निवारे तयार केले.. विरोधकांनीही भूकंपाचं राजकारण केलं नाही. त्यामुळेच जगातलं सर्वात मोठं पुनर्वसन वेगात पार पडू शकलं.
मोठ्या क्षमतेचा भूकंप होण्याआधी किल्लारी परिसराला भूंकपाचे धक्के बसले होते. तज्ञांनी पाहणी करुन पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला होता.. पण सरकार आणि लोकांनी निसर्ग किती प्रलयकारी असू शकतो याची कल्पनाच केली नव्हती.
अंतर्गत रस्त्यांना अजूनही पैसे नाही
नियोजनबद्ध पुर्नवसनामुळे पुनर्वसित गावं महानगरातल्या कॉलन्यांसारखी टुमदार दिसतात. किल्लारी दोन ठिकाणी पुनर्वसित झालं आहे. पण त्यामुळे जुन्या गावठाणापासून शेतीचं अंतर वाढलंय. शेतकामांना मजूर मिळत नाहीत. लोकांनी दुभती जनावरं पाळणं सोडून दिलंय. किल्लारी गावातल्या 64 किमीच्या अंतर्गत रस्त्यांना मेटेंन्सचे पैसे आजवर मिळाले नाहीत. युतीच्या काळात किल्लारीच्या रस्त्याचे पैसे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खर्च झाले.
भूकंपरोधक म्हणून उभारण्यात आलेल्या काही घरांना तडे गेलेत. करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेले कित्येक व्यापारी गाळे..व्यायामशाळा..व्यापारी संकुल...वसतीगृह..महिला केंद्र अशा शेकडो इमारती वापराविना पडून आहेत.
सगळं काही गमावल्यानंतरही गाव न सोडणारे काकासाहेब
सास्तूर गावात 600 जणांचे बळी गेले. पुनर्वसनानंतर नवीन सास्तुर तयार झालं.. पण काकासाहेब पाटलांनी जुन्या गावातली गढी सोडली नाही. भूंकपात पडलेल्या तीन वाड्यांची डागडुजी करुन काकासाहेब आजही उद्ध्वस्त सास्तुरच्या मध्यभागी एकटेच राहतात. दीडशे एकर जमिनीची देखभाल करण्यासाठी सात-आठ गड्यांची सोबत आहे. संरक्षणासाठी बंदुका.. संगतीला बदकं, कबुतर..विदेशी कुत्री... यांच्या समवेत भूंकपाचं दुःख विसरण्याचा काकासाहेब यांचा प्रयत्न असतो.. पण काकासाहेबांसाठी भूकंपानंतरची 25 वर्षे फार मोठा काळ नाही...
काकासाहेबांसारखी अनेक वयोवृद्ध माणसं भूकंपाचं दुःख चेहऱ्यावर घेऊन जगतात. नव्या वसाहतीत घरं टुमदार आहेत..पण गावपण हरवलेलं आहे.. पुनर्वसित गावातल्या नव्या शेजाऱ्यांची एकमेकांशी नाळ जुळत नाही. अजूनही या भागाला अधूनमधून भूंकपाचे धक्के बसतात.. त्यामुळे पुन्हा प्रलय येईल..होत्याची नव्हतं करेल.. अशी भीती कायम असते.
सास्तुर गावच्या भर चौकात मनोहर शिंदेंचं प्रयाग रेस्टॉरंट होतं. नव्या वसाहतीत मनोहररावांनी जुन्याच नावांनी हॉटेल सुरु केलंय. फक्त आज त्यांच्या सोबत त्यांची तीन मुलं नाहीत. तीन मुलांशिवाय जगण्याला काही अर्थ आहे का, असा प्रश्न विचारताना त्यांना अश्रू अनावर होतात.
भूकंपाने तीन मुलं हिरावून घेतल्याचं दुःख मनोहररावांचं आहे. पण भूकंपानंतर या भागात आलेली व्यसनाधिनता.. मदतीच्या गैरवापरामुळे भूकंपग्रस्तांचं उद्ध्वस्त झालेलं सामाजिक जीवन सावरण्यासाठी मनोहरराव अटोकाट प्रयत्न करतात. हॉटेलमध्ये सगळीकडे व्यसनमुक्तीचे संदेश अडकवलेत. आज या भागातल्या तरुणांना रिकामटेकडेपणाचा रोग जडलाय, असं ते म्हणतात.
आजही प्रश्न कायम
भूकंपग्रस्त भागात सुरुवातीला 30 ते 35 सामाजिक संस्थांनी काम सुरु केलं होतं. अनेक संस्थांना वेगवेगळ्या उपक्रमात काम करण्याची संधी मिळाली. हळूहळू सरकारी अनुदानाचा वेग ओसरला. तशा सामाजिक संस्थाही गायब झाल्या. पण सास्तुरमधलं स्पर्श रुग्णालय एक अपवाद आहे. मुंबईच्या एसओएस या सेवाभावी संस्थेच्या या दवाखान्याला उत्कृष्ट रुग्णसेवेचे दोन राज्यस्तरीय पुरुस्कार मिळाले आहेत. 25 वर्षानंतरही या भागाला अशा हॉस्पिटलची गरज आहे..
भूकंपाने उद्ध्वस्त केलेली घरं..गावं...त्यानंतरचे परिणाम बघितले तर दिसतं मनुष्य निसर्गापुढे नगण्य आहे. भव्य निसर्गाला काबूत करताच येत नाही. तसा प्रयत्नही कोणी करु शकत नाही. पण जपानसारखी तांत्रिक प्रगती करुन किमान जीवितहानी तरी निश्चित कमी करता येते. आपण या भूंकपापासून काही शिकलोय का असा प्रश्न निर्माण होतो. कारण, 25 वर्षांनंतरही या भागातील लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत.
VIDEO : प्रलयकारी भूकंपाची 25 वर्षे