बीड येथील अखिल भारतीय समता परिषद आयोजित समता मेळाव्यात भुजबळ बोलत होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी सुरुवातीलाच दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. हा समतेचा मेळावा बीडमध्ये होत आहे. बीडमध्ये बऱ्याच वर्षांनी आलो. समतेच्या कार्यात आमच्या खांद्याला खांदा लावून लढणारे गोपीनाथजी मुंडे आमच्यात नाहीत. त्यांना यावेळी मी आदरांजली अर्पण करतो. समतेचा प्रश्न आला तेव्हा पक्षाचा, पदाचा विचार न करता समतेच्या मागे ताकद उभी करण्याचं काम गोपीनाथराव यांनी केलं, असं ते म्हणाले.
“मी जेलमध्ये असताना नाशिकमध्ये मोर्चा निघाल्यानंतर बीडमध्येही माझ्या सुटकेसाठी मोठा मोर्चा झाला. त्यामुळे बीडपासून मी दुसऱ्या इंनिगला सुरुवात केली आहे. आम्हाला तुरुंगात पाठवल्यानंतर अनेकांनी मोर्चे काढले, धरणे धरले, उपास-तपास केले. अनेक नेते भेटायला आले. बीडमधील जयदत्त क्षीरसागर, धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, पंकजाताई मातोश्रींसह दीड तास बसून होत्या. हे सर्वांचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, असं म्हणत भुजबळांनी सर्वांचे आभार मानले.
मला अटक महाराष्ट्र सदनातील घोटाळा केला म्हणून झाली. महाराष्ट्र सदन 20 वर्षांपासून पडून होतं. त्याचं बांधकाम करण्याचं प्रकरण मी कॅबिनेट कमिटीपुढे नेलं. अजित दादांनी मलबार हिल रेस्ट हाऊस बांधून द्या, असं सांगितलं. मी मंत्री म्हणून शंभर कोटीत या सगळ्या बिल्डिंग चांगल्या बांधून घेतल्या. महाराष्ट्र सदन सुंदर बांधलं. आमच्या महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले, यांचे पुतळे महाराष्ट्र सदनात बसवले. आता पंतप्रधान मोदी, अमित शाह तिथे मीटिंग घेतात. नुकतीच राहुल गांधींनी तिथे पत्रकार परिषद घेतली, असं भुजबळ म्हणाले.
काही लोकांनी सुरुवात केली, मी या महाराष्ट्र सदन बांधकामात 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं सांगितलं. सरते शेवटी साडे आठशे कोटींचा घोटाळा झाला असा दर वेळी आकडा खाली आला. शंभर कोटीचे टेंडर आणि हजार कोटींचा घोटाळा कसा असा प्रश्न मला पडला. सात फुटाची म्हैस आणि पंधरा फुटाचं रेडकू कसं होईल. परवा केंद्र सरकारने व्याज दिलं नाही म्हणून प्रॉपर्टी अटॅच केली. जरी तुम्ही माझी सगळी प्रॉपर्टी अटॅच केली तरी लोकांचं प्रेम कसं अटॅच कराल, असा सवाल भुजबळ यांनी केला.
“डांबले तुरुंगात जरी मज, हा माझा अंत नाही. उठेन आता नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. अरे छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अशी कुठली भिंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुरं.. डोळ्यात धूळ, थांबण्यास उसंत नाही, येतील वादळे, येतील तुफान, तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिऊन अडखळणे या छगन भुजबळला पसंत नाही”, असं भुजबळ म्हणाले.
जालन्यात 1994 मध्ये समता परिषदेचा पहिला मेळावा झाला. त्यात ओबीसी आरक्षणाची मागणी आम्ही केली. पवार साहेबांनी ती मागणी पूर्ण केली. आज या ओबीसींच्या सवलतीत मंत्रालयातील शुक्राचार्य अडचणी तयार करतात. आम्ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू केली. दिल्लीत यासाठी उपोषण केलं. आज ओबीसींची शिष्यवृत्ती बंद पडली आहे. आयआयटी, आयआयएममध्ये आरक्षण काढून टाकण्यात आलं. एमपीएससीमध्ये समांतर आरक्षण होतं ते आरक्षण बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. यासंबधी कोर्टाने निर्णय दिला. आता तरी तो निर्णय अंमलात आणावा. ओबीसी समाजासाठी 27 टके आरक्षण असलं तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या सरकारी नोकरीत नऊ टक्के ओबीसी आहेत, असं म्हणत भुजबळांनी सरकारवर तोफ डागली.
आताच्या सरकारमधील सत्ताधाऱ्यांना गर्व जास्त झाला आहे. पण “तुफान जादा हो, कष्टीया डूब जाती है, घमंड जादा हो हस्तिया डूब जाती है, असा टोलाही भुजबळ यांनी यावेळी लगावला.
मराठा आरक्षण संदर्भात सरकारची नियत ठीक नाही. केंद्रात, राज्यात सरकार तुमचं आहे. एक अमेंडमेंट आणा, पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण वाढवून मराठा समाजास आरक्षण द्या, असा सल्लाही भुजबळांनी यावेळी दिला. शिवसेनेचं सुद्धा मी अभिनंदन करतो. पोटाला जात असते, त्यांना आरक्षण द्या, अशी भूमिका शिवसेनेने 1994-95 साली घेतली. ती भूमिका बदलली आहे, असं भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांचं संपूर्ण भाषण