Latur News Update : लातूरमध्ये हृदय हेलावणारी घटना घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. लातूर-औसा राष्ट्रीय महामार्गावर बुधोडा गावाजवळील आलमला मोड येथे ही घटना घडली आहे. सूरज अशोक कांबळे असं मयत तरुणाचं नाव आहे. या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून औसा पोलीस पुढील तपास करत आहेत. सूरजच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अलमला गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज रोज सकाळी पोलीस भरतीसाठी सराव करत असायचा. नेहमीप्रमाणे आजही तो घराबाहेर पडला, पण घरी परतलाच नाही. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सूरजला भरघाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला एक मित्र जखमी झाला आहे. त्याच्यावर लातूरमधील सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस होण्यासाठी मेहनत
लहानपणापासून सूरजला पोलीस खात्याचे आकर्षण असल्याने तो पोलीस भरतीसाठी दररोज धावणे आणि अन्य शारीरिक कसरती करत असे. त्यासाठी रोज पहाटे चार वाजल्यापासून मेहनत करत होता. आज सकाळी ही तो नेहमीप्रमाणे लवकर घराबाहेर पडला होता. मात्र भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. याता त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्वप्न भंगलं
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील अलमला येथे सूरजचा जन्म झाला. लहानपणापासून सूरजला पोलीस दिसले की मोठे कौतुक वाटायचं, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. आपणही मोठं झाल्यावर पोलीसच होणार असल्याचं तो आई वडिलांसह प्रत्येकाला सांगायचा. एवढंच नाही तर लहानपणी तो पोलीसांचा पोषाखही देखील अगदी हट्ट करून घालायचा. पोलीस व्हायचं स्वप्न उराशी बाळगूनच सूरज मोठा झाला. त्याने शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असल्यापासूनच तो पोलीस भरतीसाठी सराव करत होता. आज देखील नेहमीप्रमाणे तो सरावाला गेला आणि त्याच्यावर काळानं घाला घातला.
वाहनाचा शोध सुरू
दरम्यान, सूरज याला धडक दिल्यानंतर चालकाने वाहनासह घटनास्थळाहून पळ काढला आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. धडक दिलेले वाहन सापडल्यानंतरच हा अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती मिळेल, असे पोलीसांनी सांगितले. शिवाय आम्ही लवकरच या वाहनाचा शोध घेऊ अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.