Latur News : लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पहिल्या ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. लातूरच्या पानगाव इथं ऊस परिषद भरवण्यात आली होती. एफआरपीच्या रक्कमेचे तुकडे देऊन शेतकऱ्याच्या तोंडी पानं पुसण्याच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मिलीभगत धोरणाच्या विरोधात शेतकरी एकवटला पाहिजे, यासाठी मनसेच्या वतीनं ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या ऊस परिषदेत मराठवाड्यातील शेतकरी एकवटला होता. मराठवाड्यातील मनसेचे कार्यकर्ते पानगावात दाखल झाले होते. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पहिल्या ऊस परिषदचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आलं. मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थिती या ऊस परिषदेला सुरुवात झाली. 


शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या : 


ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीचे तुकडे करून पैसे देण्यात येतात. सरकार कायमच कारखानदारी करणाऱ्याच्या पाठिशी राहत आलं आहे. ही सिस्टीम बदलण्यासाठी शेतकरी एकवटला पाहिजे. यामुळे मनसेच्या वतीनं पानगाव येथे पहिली ऊस परिषद घेण्यात येत आहे. नीती आयोगाच्या शिफारशीनुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हफ्ता 60 टक्के ऊस गेल्यावर 14 दिवसांत, दुसरा 20 टक्क्यांचा हफ्ता हंगाम संपल्यावर आणि तिसरा 20 टक्के हफ्ता दुसरा हंगाम सुरु होण्यापूर्वी आहे. यावर केंद्र आणि राज्य सरकारही तयार झालं 


ऊसाचं वजन करताना करण्यात येणारी काटामारी, तसेच मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायमच येथील उसाचा रिकव्हरी रेट कमी आहे, असं कारखानदारांकडून सांगण्यात येतं. त्यातच भर म्हणजे, रिकव्हरीची चोरी कारखानदार करत असतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या छळ होतो, तो ऊस तोडणी करताना मुकादम आणि ऊसतोड टोळीचं नाव सांगत शेतकऱ्यांकडून रक्कम घेतली जाते. अॅव्हरेज वाहतूक पकडण्याची पद्धत शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे आणि गेट केन प्रकारे ऊस घेतला जातो. यासर्व अन्यायकारक प्रकार तात्काळ बंद झाले पाहिजेत, यासाठी मनसे राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. 


पक्षाचा शहरी चेहरा बदलण्याचा मनसेचा प्रयास 


मनसे हा मोठ्या शहरातला पक्ष अशी याची ओळख आहे. मात्र ग्रामीण भागातही पक्षाच्या स्थापनेपासून कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यांना ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकऱ्याचा विषय खूप कमी प्रमाणात मनसेच्या राजकीय व्यासपीठावर चर्चेत आले आहेत. पक्षाची हीच ओळख बदलण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा झाल्यानंतर पक्षातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते यांनी शेतकरी प्रश्नांकडे गांभीर्यानं पहाण्यास सुरुवात केली आहे. त्याची फलश्रुती म्हणून लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे पहिल्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेसाठी मराठवाड्यातील मनसेचं सर्व पदाधिकारी आणि या भागांतील शेतकरी आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी या ऊस परिषदेचं आयोजन केलं आहे. 


येत्या काही दिवसांत शेतकरी प्रश्नांवर मनसे स्टाइल आंदोलन राज्यभर 


दिलीप धोत्रे यांनी यावेळी स्पष्ट केले की, शेतकरी विषयी मनसे आता आक्रमक पणे राज्यभर आंदोलन करणार आहे. उसाचा विषय आहेच मात्र या भागात सोयाबीनच्या भावाचा विषय ही गंभीर आहे. सरकारच्या धोरणाचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पिकविमा, पीककर्ज सगळीकडे शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. त्यात निसर्ग साथ देत नाही. सरसकट नुकसान भरपाईचा विषय ही तुटपुंजा आहे. यामुळे आता आम्ही आक्रमकपणे या सर्व प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत.