Mumbai Cruise Case Nawab Malik : एनसीबी कारवाईप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणखी एक गौप्यस्फोट करणार आहेत. एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून एक पत्र मिळाल्याचा नवाब मलिक यांनी दावा केला आहे. पत्राचा फोटोही नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. या पत्रातील माहिती लवकरच ट्विटरद्वारे समोर आणणार असल्याचं नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितलं आहे. पत्राबाबतचं ट्विट करण्यापूर्वी नवाब मलिक यांनी आणखी ट्वीट करत लवकरच स्पेशल 26 ची घोषणा करणार असल्याचा इशारा दिला होता. नवाब मलिक यांच्या या दोन ट्विटमुळे आज ते कोणती मोठी घोषणा करणार याची उत्सुकता लागली आहे. नवाब मलिक यांनी वारंवार एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 






दोन ऑक्टोबर रोजी मुंबई क्रूज प्रकरणात एनसीबीने कारवाई करत आर्यनसह अन्य 13 जणांना अटक केली होती. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली होती. मात्र, नवाब मलिक यांनी या कारवाईवर संशय व्यक्त करत पुरावे जाहीर केले होते. के.सी गोसावी आणि भानुशाली ही लोकं कारवाईदरम्यान काय करत होती? असा पहिला प्रश्न नवाब मलिक यांनी विचारलं होतं. त्यानंतर या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं. गोसावीवर काही ठिकाणी गुन्ह्याची नोंद आहे. एनसीबीच्या कारवाईमध्ये या दोन लोकांची उपस्थिती कशी ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. नवाब मलिक यांनी वारंवार वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 






मुंबई ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेले प्रभाकर साईल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत मोठा गोप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी के. सी गोसावीही उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना सरेंडरसाठी तयार झाला. पुणे पोलिस गोसावीला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले. प्रभाकर साईल यांनी असा आरोप केला की, आर्यन खान प्रकरणात गोसावीनं शाहरुखसोबत 18 कोटींची डील केली होती. यामधील 8 कोटी वानखेडेंना देण्यात येणार होते.