Latur News: चार दिवसापासून लातूरच्या सोनखेड ग्रामस्थांना त्रस्त करणाऱ्या वानरास अखेर जेरबंद करण्यात यश आलं आहे, असं सांगून काहीच वेळ झाला असावा. वनविभागानं गावात येऊन मोठ्या प्रयत्नानंतर वानराला पकडल्याचा दावा केला. त्यामुळं सर्वांनी काही काळासाठी सुटकेचा नि:श्वास सोडला, मात्र आता पुन्हा या गावात वानराने चार लोकांवर हल्ला केला आहे.  यामुळं वन विभागाने पकडलेलं वानर ते नव्हेच अशी चर्चा आता सुरू झाली आहे.


मागील चार दिवसापासून लातूर जिल्ह्यातील सोनखेड येथे एका वानराने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. चार दिवसांमध्ये 50 पेक्षा जास्त गावकऱ्यांना आणि चार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या वानराने चावा घेत जखमी केलं होतं. औरंगाबाद आणि लातूरच्या वन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत या वानरला आज सकाळी जेरबंद केलं. पिंजऱ्यामध्ये या वानरासह इतर चार वानर जेरबंद झाली होती, अशी माहिती वनविभागाने दिल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला होता.


चार दिवसापासून घराच्या बाहेर न पडलेली लोक दैनंदिन कामामध्ये व्यस्त असतानाच आज संध्याकाळच्या वेळेला एका वानराने पुन्हा गावातील चार लोकांवर हल्ला केला आहे. मग पकडलेलं वानर कोणतं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 


काय म्हणाले वन परिमंडळ अधिकारी 
निलंगा वन परिमंडळ अधिकारी संतोष बंद यांनी सांगितलं की, सोनखेडकरांना मागील चार दिवसापासून त्रस्त करणाऱ्या वानरास आम्ही जेरबंद केलं आहे. त्याचबरोबर इतर मोठी चार वानरे आम्ही जेरबंद केली होती. या सर्व वानरांना आम्ही औरंगाबादकडे पाठवलं आहे. टोळीतील जोडी फुटल्या कारणाने काही वानरं थोड्याफार काळासाठी काही प्रमाणात असं वागू शकतात. गावकऱ्यांनी शांत राहत त्याकडे दुर्लक्ष केल्यास दोन दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकते, अशी माहिती संतोष बंद यांनी दिली आहे. 


वानराच्या दहशतीमुळे गावातील शाळा बंद 
वानराच्या दहशतीमुळे गावातील शाळा बंद केली होती, तसेच किराणा दुकानही बंद केली होती. काठी घेतल्याशिवाय गावातील अबालवृद्धांना, महिलांना बाहेर पडणे कठीण झालं होतं. गावातील व्यवहार बंद झाले होते, तसेच शेतात जाणंही मुश्किल झालं होते.  वानराच्या दहशतीमुळे अघोषित लॉकडाऊन गावात लागला होते. याची माहिती लातूर वन विभागाला कळाली. लातूर वन विभागाची 30 लोकांची टीम गावात दाखल झाली. ड्रोन कॅमेरा, जाळे, पिंजरे असे अद्यावत यंत्रणा घेऊन वन विभाग गावात दाखल झालं. या वानराने चारेक कर्मचाऱ्यांनाही चावा घेतला होता.  महाराष्ट्र कर्नाटक या सीमारेषेवर असलेलं महाराष्ट्रातील हे गाव वानराच्या टोळीला सरावलेले आहे. या भागातील बोरसुरी,माने जवळगा ,सोनखेड यासारख्या गावांमध्ये वानराच्या अनेक टोळ्या आहेत. आज पर्यंत या टोळ्यांनी गावामध्ये, शेतामध्ये थोडंफार नुकसान केलं आहे..मात्र मानवी वस्तीत लोकांवर हल्ले केले नव्हते. मागील चार दिवसापासून या वानराने लोकांवर जबरदस्त हल्ले करायला सुरुवात केली.  जखमी लोकांना वन विभागाकडून आर्थिक मदत  देण्यात येणार आहे. 


ही बातमी देखील वाचा


Latur: एका वानरानं अख्खं गाव जेरीस आणलं; लातूरमधील या गावात प्रत्येकाच्या हातात काठी! नेमकं काय घडलंय