लातूर : राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अक्षरश: कबंरडं मोडलं आहे. शेतातलं उभं पिक पाण्यात गेल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. अशा संकटसमयी शेतकरी आता सरकार आणि प्रशासनाकडे मोठ्या आशेनं बघत आहेत. मात्र याही परिस्थितीत काही सरकारी अधिकारी, कर्मचारी आधी कागदपत्रे पूर्ण करा मगच कारवाई करु, अशी भूमिका घेताना दिसतं आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनाही अधिकाऱ्यांनी तसंच उत्तर दिलंय.


नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल आहेत. पीक विमा मिळवण्यासाठी त्याला अनेक ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात. या प्रकाराची माहिती वलाडी येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरना दिली. त्यावेळी त्यांनी तिथूनच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावला आणि शेतकरी असल्याचं भासवून संभाषण केलं. तेव्हा अधिकाऱ्याने त्यांना सामन्य शेतकऱ्यांप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं दिली. हा सगळा प्रकार घडला त्यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांतही तेथे उपस्थित होते. निलंगेकर वलाडी भागात पिकाची आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते.



कागदपत्र गोळा करणे, कार्यालयात ये-जा करणे यामध्ये अनेक दिवस निघून जातात आणि खर्चही होतो. कार्यालयात गेल्यावरही अधिकारी आम्हाला वेठीस धरतात, असं येथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितलं. मात्र निलंगेकरांना आज हा सगळा प्रकार स्वत: अनुभवल्याने शेतकऱ्यांची अवस्था सरकारी कार्यालयात काय होते, हे त्यांना कळालं असेल.


डोक्यावर कर्ज झाले आहे, सतत असं होत आहे, काय करावं सांगा. बँक, खासगी सावकारही पैसे देत नाहीत. मुलाबाळांची लग्ने राहिली आहेत. पीक विम्याचे पैसेही मिळत नाहीत. आता का फाशी घ्यावी, अशी विचारणा शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना केली. शेतकऱ्यांचं ते बोलणं ऐकूण पालकमंत्रीही काही वेळ निशब्द झाले होते.


लातूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. अनेक पिके पाण्यात सडल्याने खराब झाली आहेत. आता दाद कोणाकडे मागावी अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे, काळजी करु नका. प्रशासनातील प्रत्येक जबाबदार घटक शेतकऱ्यांसोबत आहे. तात्काळ पंचनामे होतील, असा शब्द पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला.