लातूर : चपलेच्या दरावरुन सुरु झालेल्या वादाचं पर्यवसन हाणामारीत झाल्यानंतर दुकानदाराने ग्राहकाचं डोकं फोडल्याची घटना समोर आली आहे. लातूरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या गंजगोलाईत दुकानदाराने ग्राहकाला बेदम मारहाण केली.
ग्राहक हा देव आहे, असं दुकानदार मोठ्या अभिमानाने सांगत असतात. मात्र याच देवासोबत भाव कमी करण्यावरुन झालेल्या वादानंतर चोप देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
लातूर शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या गंजगोलाई भागातील बाबा तांबोळी यांच्या चपलेच्या दुकानात गुरुवारी राडा झाला. ग्राहक माधव सुर्यवंशी पत्नी आणि मेव्हणा विक्रम शिंदेसह दुकानात गेले होते. सुर्यवंशी यांच्या पत्नीने चप्पल पाहिली. दुकानदाराने त्याची किंमत 250 रुपये सांगितली. तेव्हा त्यांनी 200 रुपयांना चपलेची मागणी केली.
भडकलेल्या दुकानदाराने ग्राहकाला शिवीगाळ केल्याचा, तसंच महिलेबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करण्यात आला. हमरीतुमरीवरुन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. दुकानदाराने सहकाऱ्यांना बोलावून ग्राहकाला बेदम चोप दिला. त्यानंतर मारहाण झालेल्या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली.
गांधी चौक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मारहाण करणाऱ्या तिघा जणांना अटक केली. जखमी विक्रम शिंदे यांच्यावर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. लातूरच्या कोर्टात आरोपींना हजर केलं असता दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.